लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नोंदणी नाही म्हणून सरकारी मदतीला वंचित राहिलेल्या घरेलू कामगार महिलांची नोंदणी करून घेण्यासाठी कामगार कार्यालयच अनुत्साही असल्याचे मंगळवारी दिसले. दररोज फक्त १०० अर्जच स्वीकारले जातील, असे १ हजार अर्ज नोंदणीसाठी घेऊन आलेल्या महिलांना सांगण्यात आले.
स्वतः घरेलू कामगार असलेल्या एरंडवणे येथील कविता थोरात तसेच आम आदमी पार्टीच्या ललिता गायकवाड यांनी पुढाकार घेत सुमारे १ हजार घरेलू कामगार महिलांकडून त्यांचे नाव पत्ता आधार कार्ड, बँक खाते क्रमांक असा तपशीलवार अर्ज भरून घेतले.
हे अर्ज घेऊन त्या महिला वाकडेवाडी येथील कामगार कार्यालयात गेल्या. मात्र इतके अर्ज एकाच वेळी स्वीकारता येणार नाहीत, फक्त १०० अर्ज स्वीकारले जातील, त्याचे वार्षिक प्रत्येकी ६० रुपयेप्रमाणे पैसे जमा करा, पावती नंतर मिळेल, पैसे जमा करताना महिलांची उपस्थितीही आवश्यक आहे, असे त्यांना सांगण्यात आले.
आम आदमी पार्टीचे श्रीकांत आचार्य या महिलांसमवेत होते. ते म्हणाले, इमारत बांधकाम मजूरांची नोंदणी ऑनलाइन होते, त्यांंना यावे लागत नाही व घरकाम करणा-या महिलांना मात्र सक्ती केली जात आहे हे योग्य नाही.
आधीच ३१ मार्च २०२१ पूर्वी नोंदणी केलेल्या महिलांनाच १५०० रुपये देण्याची अट सरकारने ठेवली आहे. तरीही या महिला नोंदणी करत आहेत तर नोंदणीच करून घेतली जात नाही, असे आचार्य म्हणाले. ---//
एकगठ्ठा अर्ज स्वीकारू नयेत, असे सरकारचे परिपत्रक आहे. आलेल्या अर्जांची छाननी करावी लागते, त्याला वेळ लागतो. हा कामाच्या सुलभतेचा विषय आहे, नोंदणी करायला नकार देण्याचा नाही.
विशाल घोडके- सहायक कामगार आयुक्त, पुणे.