डिंभे: डिंभे-आहुपे या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. रस्त्यावर मोऱ्यांची कामे व चढ-उतार कमी करण्याची कामे सुरू आहेत. पिंपरगणे येथे वनविभागाने या कामास अडकाठी केली आहे. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत. बांधकाम विभागाकडूनही दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक आदिवासी तरुणांनी एकत्र येत या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे.
डिंभे-आहुपे या रस्त्यावर पिंपरगणेच्या हद्दीत ज्या ठिकाणी वनविभागाने रस्त्याचे काम करण्यास हरकत घेतली आहे. तेथे अहुपेकडे जाणाऱ्या रस्त्याला मोठ- मोठे खड्डे पडले असून अतिवृष्टीमुळे येथे रस्ताही वाहून गेला आहे. यामुळे येथील दळणवळणाची गैरसोय होऊ लागली होती. वारंवार सांगूनही बांधकाम विभागाकडून या रस्त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने स्थानिक आहुपे, पिंपरगणेच्या तरुणांनी एकत्र येत आपल्यालाच या रस्त्यावरून ये-जा करायची आहे, त्यामुळे कोणत्याही आर्थिक मदतीची अपेक्षा न धरता या तरुणांनी पाच किमी पर्यंत येऊन रस्त्यात पडलेले खड्डे बुजविण्याचे काम केले. त्यांनी केलेल्या श्रमदानातून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.
मागील वर्षी सुध्दा याच ठिकाणी हा रस्ता खचला होता व मोठ मोठे खड्डे पडलेले होते, तेव्हाही पिंपरगणेच्या तरुणांनी हा रस्ता दुरुस्त केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे यावर्षी तरी लक्ष देऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे नाहीतर बांधकाम विभागाच्या कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.या रस्त्यावर अनेक ठिकाणी साईटपट्या व गटारे न काढल्याने अनेक ठिकाणी रस्ता तुटला आहे. याची तत्काळ दुरुस्ती करून पिंपरगणे हद्दीत राहिलेला रस्ता पूर्ण करावा अशी ही मागणी संदीप गवारी व दीपक असवले, रोशन असवले, सुनील अंकुश,संदीप असवले,सखाराम मेमाणे, सुभाष लोखंडे, साहिल साळवे,दिनेश भवारी,विशाल भवारी, होनाजी गवारी,कुशाबा पारधी या तरुणांनी केली आहे.
१६ डिंभे
पिंपरगणेच्या हद्दीत श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती करताना तरुण.