लोणी काळभोर : पिंपरी सांडस येथे झालेल्या खुनाच्या सलग तीन दिवस होणाऱ्या चौकशीत आपले बरे वाईट होईल या भीतीपोटी भवरापूर येथील एकाने विष पिऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्या व्यक्तीने चिठ्ठी लिहली आहे. खून कोणी केला हे अद्याप सिद्ध झालेले नाही. परंतू पोलिसांच्या भीतीपोटी एका निष्पापाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बाबासाहेब बबन काटे (वय-३२, रा. भवरापूर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. तर संतोष उर्फ पोपट तुकाराम गायकवाड (वय ४५ , रा. भवरापूर , ता.हवेली ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गायकवाड यांचा मासेमारीचा व्यवसाय होता. ते मंगळवार (१ जानेवारी) रोजी बहिणीकडे जातो असे सांगून घराबाहेर पडले होते. त्यानंतर ४ जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह शरीराचे धड व हात - पाय छाटलेल्या अवस्थेत मिळून आला होता. त्यानंतर रविवार (६ जानेवारी) रोजी त्याचे शिराचा व हाताचा भाग उरुळी कांचन येथील जुन्या तांबेवस्ती नजीकच्या ओढ्यात मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
त्यानंतर याप्रकरणी बाबासाहेब काटे यांचेसह सुमारे २० जणांची लोणी काळभोर, लोणीकंद पोलीसांसह क्राईम ब्रँच युनिट ६ च्या पथकाने सलग तीन दिवस चौकशी केली होती. काटे यांनी आत्महत्या केल्यानंतर पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये त्यांनी पोलिसांच्या चौकशीत बरे वाईट होईल या भीतीने आपण आत्महत्या करत असल्याचे लिहले आहे.
गायकवाड यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सतत तीन दिवस सुरू असलेल्या चौकशीत आपल्याला दुःख झाले आहे. हा खून कुणी व का केला याची मला माहिती नाही. खून करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे. पोलिस माझी चौकशी करीत असल्याने माझ्या कामाच्या ठिकाणी खाडे होत आहेत. माझ्याकडे पैसे नाहीत व मी मेल्यानंतर माझ्या मुलीचे व बायकोचे कसे होणार? माझ्यावर कोणताही दबाव नाही. घरच्यांना कोणीही त्रास देऊ नका. मला जेवढी माहिती होती तेवढी मी पोलिसांना दिली आहे. मला मरायचे नव्हते पण माझे नाव आले त्यामुळे मागील तीन दिवसांपासून मी जेवलो नाही किंवा मला झोपही लागली नाही. मला माझ्या मुलीला शिकवायचे होते. परंतु मला खूप टेंशन आल्यामुळे मी औषध घेत आहे. पोलिसांना जबाबदार ठरवत नसल्याचेही चिट्ठीत नमूद करण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी या गंभीर गुन्ह्याचा शोध लागावा म्हणून काटे यांचेसह सुमारे २० जणांकडे चौकशी करण्यात येत होती. यासंदर्भात त्यांना ताब्यातही घेण्यात आले. केवळ तपासाचा भाग म्हणून त्यांना बोलावण्यात आले होते. यादरम्यान त्यांचेवर कोणताही दबाव टाकण्यात येत नव्हता.