पुणे : कन्स्ट्रक्शनचे काम करताना पाचव्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना स्वारगेट भागातील सेव्हन लव्हज चौक परिसरात घडली. याप्रकरणी कंपनीचे मालक, सुपरवायझर यांच्यावर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुपरवायझर प्रवीण नाथा कोदर आणि ऑरेंज मशिनटेक प्रा. लि. कंपनीचे मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर, चंद्रा कुबेर पात्रा (२०, गुलटेकडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत सुरेश पात्रा (३५) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि. २४) दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेटमधील सेव्हन लव्हज चौक परिसरात सुयोग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड युनिट १२ येथे काम सुरू आहे. फिर्यादी यांचा चुलतभाऊ चंद्रा पात्रा व इतर तिघेजण ट्रॉवर क्रेन मशीन खोलून त्याला केबल लावण्याचे काम करीत होते. त्याचवेळी चंद्रा पात्रा हे पार्किंगच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वेळोवेळी संरक्षक साहित्याची मागणी करूनही अविचाराने व हयगयीने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.