प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत मांडवगण फराटा, वडगाव रासाई, इनामगाव, कुरुळी, सादलगाव, शिरसगाव काटा, कोळगाव डोळस, पिंपळसुटी, इनामगाव, तांदळी, गणेगाव दुमाला, बाभूळसर बुद्रुक ही लोकसंख्येने मोठी असलेली गावे आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे ॲंटिजन टेस्ट साठी आवश्यक असलेले किट उपलब्ध नाही. त्यामुळे संशयित रुग्णांना खासगी प्रयोगशाळांचा आधार घ्यावा लागत आहे. या प्रयोगशाळांकडून तपासणीसाठी मनमानी पद्धतीने दर आकारणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना पैशाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
या भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. एकाच कुटुंबातील व्यक्तींचे मृत्यू झाल्याच्या घटनाही ताज्या आहेत. त्यामुळे योग्य वेळी कोरोनाची तपासणी होण्यासाठी शासनाने लवकरात लवकर ॲंटिजन टेस्ट किट उपलब्ध करून द्यावेत, अशी येथील नागरिक मागणी करीत आहेत.
सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ॲंटिजन टेस्ट किटचा मोठा तुटवडा आहे. पुणे जिल्ह्यासाठी ८० लाख किट कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. नियमांचे पालन करुन स्वतःसह कुटुंबाला कोरोनापासून दूर ठेवणे आवश्यक आहे.
सुजाता पवार, जिल्हा परिषद सदस्य पुणे