मार्च महिना ठरला घातक : नागरिकांमध्ये भीती, कोरोना वाढतोय
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका पुणे शहराला बसला असून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झालेली रुग्णवाढ सुरूच आहे. गंभीर रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयात खाटा आणि रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत.
शहरातील सक्रिय रुग्णांचा आकडा ४५ हजारांच्या पुढे गेला आहे. दिवसा साडेपाच हजार रूग्णांची वाढ होत चालली आहे. फेब्रुवारी महिन्यात १००-२०० ने होणारी वाढ साडेपाच हजार रुग्णांवर गेली आहे. मार्च महिन्यात जवळपास ७० हजार रुग्ण वाढले आहेत. तर, ८ एप्रिलपर्यन्त ३१ हजार रूग्णांची वाढ झाली आहे. मृत्युदर मात्र दोन टक्क्यांच्या खाली आहे. शहरातील सर्वाधिक रुग्णसंख्या हडपसर, नगररस्ता, सिंहगड रस्ता, वारजे या उपनगरांमध्ये आहे. झोपडपट्टी बहुल भागात नगण्य रुग्ण आहेत. सोसायटी आणि इमारतींमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.
शहरातील खासगी रुग्णालयांमधील खाटा प्रशासनाने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच जम्बो कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. डॉ. नायडू रुग्णालय आणि बाणेर कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने भरले आहे. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन खाटा वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.
---/---
जानेवारीपासून मार्चपर्यंत दर महिन्याची कोरोनो रुग्णांची संख्या आणि झालेले मृत्यू
महिना। रुग्ण संख्या। मृत्यू। सक्रिय रुग्ण
जानेवारी। ७,१५३। १३४। १९४४
फेब्रुवारी। १६,७८०। ९३। ४,९१९
मार्च। ७०,७४४। ४७८। ३५,८४९
८ एप्रिल पर्यंत। ३१,९२६। २३०। ४६,०७१
--------
१. शहरातील इमारती आणि सोसायट्यांमध्ये सर्वाधिक संसर्ग, झोपडपट्टी आणि वसाहतींमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी आहेत. त्यामुळे गृह विलगिकरणात राहणाऱ्यांची संख्याही अधिक आहे.
२. शहराच्या हडपसर भागात सर्वाधिक ८०० रुग्ण असून त्याखालोखाल नगर रस्ता (५९६), सिंहगड रस्ता (५३४), वारजे (४७९) आणि कोथरूड (४३५) या उपनगरांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.
३. सध्या बेड खासगी आणि शासकीय रुग्णालयांकडील ६ हजार ६०० बेड कोविडसाठी राखीव आहेत. विलगीकरणासाठी कोविड सेंटर आणि विलगिकरण व्यवस्था तयार करण्यात आली आहे. नुकतीच दोन हजार खाटांची क्षमता असलेले पाच विलगिकरण केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- शहरात १६ जानेवारीपासून पाच लाखांपेक्षा अधिक लसीकरण झाले आहे. पुण्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत हा वेग कमी आहे. पालिकेच्या मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे.
- सरकारने कडक केलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी प्रशासनाकडून गांभीर्याने केली जात आहे. मात्र, काही ठिकाणी ढिलाई होत असल्याचेही चित्र आहे. विनाकारण फिरणारे नागरिक, थुंकीबहाद्दर आणि विनामास्क फिरणारे नागरिक नियम पाळत नसल्याचे चित्र आहे.
---////---
नागरिकांची स्वॅब चाचणी वाढविण्यात आली आहे. यासोबतच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आला आहे. लसीकरणाचाही वेग वाढविण्यात येत असून केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. गंभीर रुग्णांकरिता खाटांची उपलब्धता वाढविण्यासाठी खासगी रुग्णालयांसोबत बोलणं सुरू आहे. शहरात साडेसहा हजार खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव आहेत.
- डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका
--------
नागरिकांना लस, पुरेशा खाटा आणि औषधे उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे. खाटा वाढविण्यासोबतच लसीकरणाचा वेग वाढविण्यात येत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनकरिता आम्ही अन्न व औषध प्रशासनाच्या संपर्कात आहोत. लॉकडाऊनमध्ये घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करून कोरोना साखळी तोडण्यास प्रशासनास नागरिकांनी मदत करावी.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका