दीपक जाधव, पुणे बाक आणि बोलार्ड खरेदी हा नगरसेवकांच्या अत्यंत जिव्हाळयाचा विषय असल्याचे नुकतेच उजेडात आले आहे. आतापर्यंत त्याची खरेदी महापालिकेकडून दुप्पट किमतीने करण्यात येत असल्याने पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याची धक्कादायक माहिती अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्या चौकशीतून निष्पन्न झाली आहे. बाक आणि बोलार्डच्या किमती प्रचंड फुगवल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी त्या निम्म्यावर आणल्या आहेत. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाजारभावाचा आढावा घेऊन त्यानुसार पालिकेला वर्षभरात खरेदी करावयाच्या वस्तूंची पायाभूत किंमत (डीसीआर) प्रशासनाकडून निश्चित केली जाते. त्यानुसार प्रशासनाने स्टीलच्या बाक व बोलार्डच्या किमती निश्चित केल्या होत्या. या किमतीनुसार नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डस्तरीय निधीतून मोठ्या प्रमाणात बाक व बोलार्डच्या खरेदी केल्या आहेत. याच्या किमतीचा मोठा घोळ अतिरिक्त आयुक्तांच्या चौकशीतून उजेडात आला आहे.स्टीलच्या बाकड्यांची बाजारातील प्रत्यक्षातील किंमत ७ हजार २०० इतकी असताना त्याची आतापर्यंत १४ हजार २८८ इतक्या दुप्पट किमतीने खरेदी करण्यात आली आहे. बोलार्डची किंमत ४ हजार ७६३ इतकी असताना त्याची ९ हजार रुपयांनी खरेदी झाली आहे. नगरसेवकांनी वॉर्डस्तरीय निधीतून आतापर्यंत बाक खरेदीसाठी ११ कोटी रुपयांचा खर्च केला आहे, तर बोलार्डचीही मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेचे या खरेदीमध्ये आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रेरणा देशभ्रतार यांनी बाजारात भावाचा नव्याने आढावा घेऊन त्यांच्या डीसीआरमधील किमतीमध्ये बदल केले आहेत. मात्र आतापर्यंत झालेल्या खरेदीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महापालिकेच्या वतीने २०१४-१५ तसेच २०१५-१६ या आर्थिक वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बाक व बोलार्ड यांची खरेदी करण्यात आली आहे. त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप नगरसेवक अविनाश बागवे यांनी मुख्य सभेत केला होता. त्यावरून जोरदार चर्चा झाली होती. त्या वेळी याच्या किमतीची ५ दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य सभेने अतिरिक्त आयुक्तांना दिले होते. नगरसेवकांकडून वॉर्डस्तरीय निधीतून सर्वाधिक खर्च हा बाक व बोलार्ड खरेदीवर करण्यात येत असल्याचे नुकतेच उजेडात आले आहे. नगरसेवकांकडून शहरामध्ये बसायला जागा नसणे व पदपथावर बोलार्ड बसविणे या दोनच प्रमुख समस्या आहेत की काय, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. डीसीआर किमतीचा फुगवटा पाहिला असता त्यामागचे इंगित लक्षात येऊ लागले आहे.
बाक खरेदीत कोट्यवधींचे नुकसान
By admin | Published: August 10, 2016 1:51 AM