पुणे : पुणे पोलीसांची झोप उडविणाऱ्या सोनसाखळी चोऱ्या कमी करण्यात पोलीसांना यश आले असले तरी फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. खुन, खुनाचा प्रयत्न, दिवसा घरफोडी, वाहनचोरी, महिलांवरील अत्याचार, सायबर गुन्हे यामध्ये २०१६ या वर्षात वाढ झाली असून जबरी चोरी, दरोडा, चैनचोरी या गुन्ह्यात घट झाली असल्याचे दिसून येत आहे़ पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गुरुवारी २०१६ या वर्षभरात झालेल्या गुन्हे व कायदा सुव्यवस्था याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली़ यावेळी सह पोलीस आयुक्त सुनिल रामानंद, अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, तसेच सर्व पोलीस उपायुक्त उपस्थित होते़ वाहनचोरी चिंतेचा विषयवाहनचोरीचे ३०७३ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ८२१ गुन्हे उघडकीस आले आहेत़ त्यातील बहुतांश गुन्हे हे परिमंडळ २ व ४ मध्ये घडले असून सातत्याने वाहनचोरी होत असलेले स्पॉट पोलिसांनी निश्चित केले आहे़ त्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले असून हे गुन्हे रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे़ वाहनचोरी करणाऱ्या १८ टोळ्यांमधील ६२ गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून १३५ गुन्हे उघडकीस आले आहेत़ एकूण १ कोटी २५ लाख रुपयांची ८२१ वाहने जप्त करण्यात आली आहेत़(प्रतिनिधी)
साखळीचोऱ्या कमी, पण फसवणुकीत वाढ!
By admin | Published: January 06, 2017 6:58 AM