--
अवसरी : आंबेगाव तालुक्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीला नातेवाईक ताब्यात घेण्यास घाबरत आहे. त्यामुळे मंचर येथील स्वयंसेवी संस्था मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करत आहेत. सध्या सरपणाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने शासनाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विद्युत दाहिनी उभारावी, अशी मागणी होत आहे.
तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहे. गतवर्षीच्या तुलनेत मृत्यूदरातही मोठी वाढ झाली आहे. तालुका आरोग्य विभाग अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पूर्ण लक्ष आहे. रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी चहा, पाणी, नाष्ट्याची सोय शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा करत आहे. तसेच गोवर्धन डेअरी मार्फतही रुग्णांना नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व देवेंद्र शहा यांचे आभार मानले.
उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे दररोज कोरोना टेस्ट केली जाते व गावोगावी लसीकरण मोहीम राबविली आहे. लसीकरणाबाबत तालुक्यात कोणतीही तक्रार नाही.
आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांच्या नियोजनातून लसीकरण केले जाते. मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावात पोलीस बंदोवस्त ठेवण्यात आला आहे. एकंदरीत आंबेगाव तालुक्यात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन चालू आहे. तसेच अवसरी खुर्द येथिल कोविड सेंटर मध्ये १००० ते १२०० रुग्णांची योग्य काळजी घेतली जात आहे.
परंतु तालुक्यात सध्या सरपणाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीला नातेवाईक ताब्यात घेण्यास घाबरत आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विद्युत दाहिनी उभारावी अशी मागणी होत आहे.