पुणे : गेल्या दशकात कृषी विद्यापीठांमध्ये भरती प्रक्रिया झालेली नाही तर दुसरीकडे प्रत्येक महिन्यास सेवानिवृत्त होण्याऱ्या अनुभवी शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यामुळे निर्माण होणाऱ्या मनुष्यबळाच्या कमतरतेत देखील प्रभावीपणे काम करणे अशी तारेवरची कसरत सर्वच कृषी विद्यापीठे, त्यांचे कुलगुरू व शास्त्रज्ञ व प्राध्यापक यांना करावी लागत आहे, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केले.
कुलगुरूपदी नियुक्ती झाल्यानंतर ढवण यांनी शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाला नुकतीच भेट दिली. ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. भेटीवेळी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. सुनील मासळकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक व अधिकारी उपस्थित होते. डॉ. ढवण म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या व राज्याच्या कृषि विकासामध्ये कृषि महाविद्यालयाने मोलाचे योगदान दिले आहे. केवळ ५५ टक्के कर्मचारी असतानाही कोविडच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाने चालविलेले शैक्षणिक व संशोधन उपक्रम स्तुत्य आहेत.