जम्बो केअर सेंटर झाले तरीही वैद्यकीय यंत्रणा 'व्हेंटिलेटर'वरच ; आता मुख्यमंत्र्यांनीच पुण्यात लक्ष घालावे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 05:04 PM2020-09-02T17:04:24+5:302020-09-02T17:23:53+5:30
पुण्यात वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना आजवर आपला जीव गमवावा लागला आहे
पुणे : पुण्यात दिवसागणिक वाढत असणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या चिंतेची बाब आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक उपाययोजना सुरु आहेत. कोरोनाग्रस्तांना वेळेवर उपचार उपलब्ध व्हावे यासाठी पुण्यात जम्बो केअर सेंटरची देखील उभारणी करण्यात आली. पण तिथे देखील वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि रुग्णालय व्यवस्थापन यंत्रणांमध्ये समन्वयाचा सावळा गोंधळ असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आला आहे. एकीकडे कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि दुसरीकडे रूग्णांची जीवघेणी हेळसांड होते आहे. त्यामुळे आता तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याच्या आरोग्य सेवेत दैनंदिन लक्ष घालावे, अशी मागणी भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.
पुण्यामध्ये बुधवारी (दि.२) पहाटे एका तरुण पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या पत्रकारालाही उपचार मिळण्यात अनेक अडचणी आल्या.उपचारास विलंब होणे, उपचार न मिळणे यांसारख्या कारणांमुळे पुण्यात अनेक रुग्णांचा बळी गेला आहे. गेल्या पाच महिन्यात वैद्यकीय सुविधा उभ्या करण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे.
आमदार शिरोळे म्हणाले, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. तसेच मृत्यू दर देखील वाढू लागल्याने पुणेकरांमध्ये काळजी व भीतीचे वातावरण आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील आरोग्य सेवेत दैनंदिन लक्ष घालावे आणि पालकमंत्री अजित पवार यांनी शहर तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणांचा दैनंदिन आढावा घेऊन रुग्णांना सहज वेळेवर उपचार मिळण्याची प्रक्रिया मार्गी लावण्याची गरज आहे, असे आमदार शिरोळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.