हडपसर : ग्राहकावर वीज वापरण्याला दरमहा विविध भार आकारले जातात. विजेच्या बिलामध्ये दरमहा इंधन भार, स्थिर आकार, सेवाशुल्क यांचा समावेश असतो. मात्र, वीज मंडळ महिनाभर ग्राहकाला विजेचा पुरवठा करीत नाही. हडपसर परिसरातील काही भागात दररोज वीज गायब होते. दर गुरुवारी वीज नसते. जर पूर्ण महिनाभर ग्राहकांना वीज मिळाली, तरच महावितरणला जादा पैसे मिळतील. मात्र, ग्राहकाला पूर्णवेळ वीज देण्यात असमर्थ ठरत असलेल्या महावितरणमध्ये नियोजनबद्घ कामे होत नसल्याचे दिसून येत आहे.काळेपडळ येथील गजाननमहाराज मंदिरालगतच्या रस्त्यालगत असलेल्या भूमिगत विजेची केबल जेसीबीने तुटली. भूमिगत केबल सुमारे ३ फूट खोल असणे गरजेचे आहे. या केबलवर विटांचे तुकडे टाकणे आवश्यक असते. भूमिगत केबल करण्यासाठी तांत्रिकदृट्या आवश्यक असलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब न केल्याने अशा भूमिगत केबल तुटतात. त्यामुळे तीन दिवस या भागात वीज नव्हती. प्रत्येक फीडरला चार पर्यायी केबलची व्यवस्था असते. मात्र, तशी काळजी न घेतल्याने ग्राहकांना अंधारात राहावे लागते. त्याचबरोबर, व्यावसायिकांच्या व्यवसायाचे नुकसान होते; मात्र वीजबिले नियमानुसारच आकारण्यात येतात. दररोज एक-दोन तास व दर गुरुवारी असा पूर्ण महिन्याचा विचार करता महिनाभरात सहा ते सात दिवस वीज गायब असते. मग आकार का कमी होत नाही, असा सवाल विचारला जात आहे.याबाबत भेकराईनगर शाखेचे सहायक अभियंता बाजीराव दुबल यांच्याशी संपर्क साधला असता, काळेपडळ परिसरात जेसीबीने केबल तुटल्याने वीज खंडित झाली आहे. तिच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. लवकरच पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे सांगण्यात आले. (वार्ताहर)४विजेचा लपंडाव, व्होल्टेज कमीजास्त होणे यांमुळे ग्राहकांचे नुकसान होते. मात्र, त्याकडे वीज मंडळाचे अधिकारी लक्ष देत नाहीत. पर्यायी व्यवस्था का केली जात नाही, असा नागरिकांना प्रश्न पडला आहे. वीज खंडित झाल्यावर ग्राहक तक्रारी नोंदवितात. मात्र, त्या वेळी अधिकारी फोन उचलत नसल्याचे ग्राहकांनी सांगितले.
‘महावितरण’मध्ये नियोजनाचा अभाव
By admin | Published: April 26, 2015 1:20 AM