लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात करोनाच्या संसर्गाची तीव्रता कमी झाली असली तरी बाधीत रुग्णांना नंतर उपचार देण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोस्ट कोव्हीड सेंटरच्या सुविधेचा अभाव असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य केंद्रातून क्लिनिक सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची बैठक गुरुवारी निर्मला पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, महिला व बालकल्याणच्या सभापती पूजा पारगे, कृषी सभापती बाबूराव वाईकरांनी समाजकल्याण विभागाच्या सभापती सारिका पानसरे तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या रुग्णांना आजार झाल्यानंतर काही पुन्हा आजार होण्याची शक्यता असू शकते असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले नाही. त्यामुळे त्या रुग्णाला पुन्हा पोस्ट कोव्हीड उपचाराची गरज निर्माण झाली आहे. परंतु, पोस्ट कोव्हीडची जिल्ह्यात सुविधा नाही. परिणामी रुग्णांचे उपचाराभवी मृत्यू होत असल्याचे प्रकार जिल्हयात घडत आहेत, अशी माहिती भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी सभागृहात दिली.
जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात कंत्राटी तत्वावर आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, सध्या रुग्ण कमी असल्याने त्यांना काम नाही. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन पोस्ट कोव्हीड रुग्णांची माहिती गोळा करण्यात यावी. तसेच जिल्ह्यात पोस्ट कोव्हीड सुविधा सुरू करावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. तसेच जिल्ह्यातील कोव्हीड केअर सेंटर मध्ये आतापर्यंत आउटसोर्सिंग केलेल्या नाष्टा, जेवण किंवा अन्य सोयी सुविधेंच्या खर्चही कंत्राटदाराना अद्याप बिले देण्यात आली नसल्याचा प्रकार बुट्टे पाटील आणि आशा बुचके यांनी निदर्शनास आणून दिला.
त्यावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी जिल्ह्यातील कोव्हीड केअर सेन्टरमधील कंत्राटदारांची बिले देण्यात आली आहेत. ज्यांची बिले राहिली असल्यास ती देण्याची व्यवस्था केली जाईल असे सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार म्हणाले, ''''जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालयात पोस्ट कोव्हीड सेंटर सुरू करण्यात आले आहे. आता जिल्ह्यात आरोग्य केंद्रात पोस्ट कोव्हीड केअर क्लिनिक सुरू करून सेवा दिली जाईल.''''