खोर (पुणे):दौंड तालुक्यातील दक्षिण पट्ट्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने यावर्षी चालू हंगाम पार पाडणे जिकिरीचे बनले गेले आहे. पावसाचा हंगाम संपला असल्याने शेतकऱ्यांपुढे सिंचन योजनेतून पाणी घेणे हाच एकमेव पर्याय पुढे उभा राहिला गेला आहे. दौंड तालुक्यातील खोर, देऊळगावगाडा, नारायण बेट, पडवी, कुसेगाव या परिसरात पाऊस झाला नसल्याने चालू व पुढील हंगाम कोलमडला गेला आहे. खोर गावाच्या उशाशी दोन जलसिंचन योजना कार्यान्वित आहेत. मात्र या योजनामधून लोक वर्गणी भरली तरच पाणी आणता येत आहे. हाता तोंडाशी आलेला घास हा केवळ पाऊस न झाल्याने हिरावून घेतला जातो की काय असाच प्रश्न चिन्ह शेतकरी वर्गापुढे पडला गेला आहे.
खोर परिसरातील शेतकऱ्यांनी तब्बल तीन वेळा लोकवर्गणीतून कार्यान्वित सिंचन योजनेतून पाणी घेतले आहे. जुलै महिन्याच्या ३ तारखेला पाहिले आवर्तन जनाई शिरसाई योजनेतून फरतडे वस्ती तलावात सोडले होते. त्यांनतर ७ सप्टेंबर रोजी दुसरे आवर्तन सोडण्यात आले होते. आता पाणी अपुरे पडले असल्याने व चालू अंजिराच्या बागांचा हंगाम पार पाडण्यासाठी २५ ऑक्टोबर रोजी तिसरे आवर्तन लोकवर्गणीतून सोडण्यात आले आहे.
खोरच्या शेतकऱ्यांनी चार महिन्याच्या कालावधीत तब्बल तीन आवर्तन हे सिंचन योजनेतून घेतले आहे. सिंचन योजनेतून आवर्तन घेणे इतकी सोपी गोष्ट नसून यासाठी शेतकरी वर्गाला पैसे मोजावे लागत आहेत. जनाई शिरसाई योजनेतून दौंड तालुक्यातील शेतकरी वर्ग किती वेळा लोकवर्गणी भरणार आणि किती वेळा या वर्षी आवर्तन घेणार हाच मोठा प्रश्न चिन्ह उभा राहिला गेला आहे. पाणी आणणे ही खर्चीक बाब आहे. जरी ही खर्चीक बाब असली तरी अंजीर बागांचा बहार जगविण्यासाठी पाणी हे महत्त्वाचे साधन आहे. कारण या वर्षी खोरच्या परिसरातील शेतकरी वर्गाने अंजीर बागांना अवाढव्य खर्च करून ऐन उन्हाळ्यात अंजीर बागा जीवापाड जोपासल्या आहेत.
ऐन हंगामात जर अंजीर बागांना पाणी कमी पडले गेले तर शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान हे होणार आहे. त्यामूळे शेतकरी राजा वाटेल तितके पैसे मोजण्यास तयार आहे. परंतु आमच्या बागा जगल्या पाहिजेत असेच म्हणणे सध्याच्या परिस्थितीत योग्य आहे. दुसरी ही पुरंदर जलसिंचन योजना आहे. या योजनेतून पाणी आणणे ही मोठी तारेवरची कसरत आहे. कारण ह्या योजनेतून एक आवर्तन सोडण्यासाठी शेतकरी वर्गाला तब्बल ६ ते ७ लाख रुपये इतका खर्च हा येत असतो. त्यामुळे जनाई शिरसाई योजनेतून पाणी घेणे शेतकरी वर्गाला सध्या परवडत आहे. आगामी काळात या सिंचन योजनांचा कायम स्वरूपाचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी काही तरी हालचाली होणे अपेक्षित आहे.