पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर झाला असून, अंतिम फेरीमध्ये ९ संघ दाखल झाले आहेत. प्राथमिक फेरीचे परीक्षण करण्याच्या निमित्ताने तरुणाईचा उत्साह आणि रंगभूमीसाठी मेहनत घेण्याची तयारी पाहून समाधान वाटले. स्वलिखित आणि उत्तम संहिता, विषयांचे वैविध्य ही यंदाच्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील सकारात्मक बाब ठरली आहे. मात्र, वाचिक अभिनयाची मोठ्या प्रमाणात कमतरता पाहायला मिळाली. मालिका, चित्रपटांच्या जगात साऊंड टेक्नॉलॉजीचा मुलांवर जास्त प्रभाव पडत असल्याने विषय चांगले असूनही प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे अवघड होत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले.
महाराष्ट्र कलोपासक संस्थेतर्फे दर वर्षी घेण्यात येणारी ही स्पर्धा महाविद्यालयीन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी, यासाठी महाविद्यालयांची चढाओढ लागल्याचे पाहायला मिळते. भरत नाट्य मंदिर येथे १५ दिवसांपासून रंगलेल्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये एकूण ५१ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेची प्राथमिक फेरी मंगळवारी पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये ९ संघांची वर्णी लागली. प्राथमिक फेरीमध्ये एकूण ५१ एकांकिका सादर झाल्या. त्यांतील ३९ एकांकिका नव्याने लिहिल्या गेल्या होत्या. त्यामुळे या माध्यमातून रंगभूमीला ३९ नवे संहितालेखक मिळाले आहेत. एकांकिकांच्या विषयांमधील वैविध्य आणि दर्जा थक्क करणारा होता. सध्याच्या तरुणाईसमोरील आव्हाने, जगाकडे, आजूबाजूच्या घटनांकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन एकांकिकांच्या संहितेमधून अनुभवायला मिळाला. शून्याची संकल्पना कशी निर्माण झाली, शून्य संपले तर काय परिस्थिती उद्भवेल, वाङ्मयचौर्य, हॅलो गुगल, वैवाहिक जीवनाबद्दलचे आधुनिक विचार, पर्यावरणाचा ºहास आणि संवर्धन असे विविधांगी विषय एकांकिकांमधून मांडण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला. आरक्षणाचा विषयही प्रभावीपणे मांडण्यात आला. विषयांची हाताळणीही वाखाणण्याजोगी होती. पुरुषोत्तमच्या माध्यमातून रंगभूमीला सुमारे ५०० कलावंत मिळाले. त्यातील ३०० नवीन आणि २०० अनुभवी कलाकार मिळणे हे रंगभूमीच्या दृष्टीने पोषक वातावरण निर्माण करणारे द्योतक आहे. प्रकाशयोजना, नेपथ्य, तंत्रज्ञान या बाबतीत विद्यार्थ्यांचा कमालीचा उत्साह होता. विद्यार्थ्यांनी वेगाने स्वत: सेट लावणे, काढणे यासाठी एकमेकांना केलेले सहकार्य पाहायला मिळाले. सांघिक भावना वाढीस लागणे, ही रंगभूमीसाठी अत्यंत आवश्यक शिकवण आहे.
चिक अभिनयाच्या कमतरतेमुळे एकांकिकांचे विषय चांगले असूनही प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे अवघड जात होते. नवीन आशय आणि विषय पुरुषोत्तम करंडक एकांकिकांच्या स्पर्धेच्या निमित्ताने रंगभूमीला मिळाले आहेत. पुरुषोत्तममधील शिस्त आणि वर्षानुवर्षे पाळला जात असलेला पायंडा, नियमावली यांमुळे स्पर्धेचा दर्जा दिवसेंदिवस उंचावत आहे. अनेक एकांकिकांमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लॅक आऊटचा वापर करण्यात आला. डोळ्यांनी दिसणे आणि कानांनी ऐकू येणे, या प्रक्रियेमध्ये अडथळा आल्यास रसास्वादामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ब्लॅक आऊटच्या प्रमाणाबाबत विद्यार्थ्यांनी सावध राहिले पाहिजे. स्वत:च्या एकांकिकेचे व्हिडीओ शूट करून पाहिल्यास त्यामध्ये सुधारणा करणे शक्य होऊ शकेल. एकांकिकेमध्ये अभिनय हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. तंत्रज्ञान, नेपथ्य, प्रकाशयोजना एकांकिकेमध्ये वरचढ ठरू नयेत, याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायला हवी.स्वलिखित आणि उत्तम संहिता, विषयांचे वैविध्य ही पुरुषोत्तम करंकड स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील सकारात्मक बाब ठरली आहे. वाचिक अभिनयाची मोठ्या प्रमाणात कमतरता पाहायला मिळाली. साऊंड टेक्नॉलॉजीचा मुलांवर जास्त प्रभाव पडत असल्याने विषय चांगले असूनही प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे अवघड होत असल्याचे अधोरेखित झाले. डोळ्यांनी दिसणे आणि कानांनी ऐकू येणे या प्रक्रियेमध्ये अडथळा आल्यास रसास्वादामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ब्लॅक आऊटच्या प्रमाणाबाबत विद्यार्थ्यांनी सावध राहिले पाहिजे, असा सल्ला प्राथमिक फेरीचे परीक्षक संजय पेंडसे यांनी दिला.