चाकण : परतीच्या पावसाच्या फटक्यातून सावरण्यासाठी आता शेतकरी सोयाबीन काढणी, मळणी आणि राशीला प्राधान्य देत असल्याचे चित्र खेड तालुक्यात दिसत आहे. निसर्गाच्या बदलत्या चक्रात शेतकरी नेहमी अडकत आहे. गेल्या वर्षी झालेल्या पावसाने सोयाबीनला चांगला उतारा दिला होता.
मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र कमी झाले आहे. परतीच्या पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन फ्लेक्स, ताडपत्रीने झाकून ठेवले आहेत. मात्र, काही शेतात सोयाबीन काढल्यानंतर अचानक आलेल्या पावसाने सोयाबीनला चांगलाच फटका बसला. ऐन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने सोयाबीनचा दर्जा घसरविला. भिजलेल्या सोयाबीनला सरंक्षण देण्यासाठी शेतकºयांना अनेक उपाययोजना कराव्या लागल्या. आता भिजलेले सोयाबीन वाळवून ते राशीसाठी तयार केले जात आहे. राशीसाठी दुहेरी कामे करावीलागत असल्याने शेतकऱ्यांना दुप्पट मजुरीसाठी पदरमोड करावी लागत आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन झाकून ठेवले होते, त्यांची शेतामध्ये यंत्राद्वारे मळणी सुरू आहे.