पुणे : शहरातील बंद लसीकरण केंद्रे, कोणत्या वयोगटाला कोठे लस मिळणार, याबाबत अनभिज्ञता यामुळे लसीकरण संथगतीने सुरू आहे. शहरात दरदिवशी केवळ ११ ते १२ हजार एवढेच डोस दिले जात आहेत. लसीकरणाच्या कासवगतीला कधी ब्रेक लागणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांडून विचारला जात आहे. दररोज सर्वच लसीकरण केंद्रांवर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. लसी न मिळाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ज्येष्ठांना लसीकरणाला प्राधान्य दिले जाईल आणि १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण तात्पुरते थांबवले जाईल, अशी घोषणा केल्याने गोंधळात आणखीनच भर पडली आहे.
जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली. त्यावेळी लस घेण्याबाबत नागरिकांमध्ये बरीचशी उदासीनता होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू झाल्यावर लसीकरणाचे महत्त्वही अधोरेखित झाले. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, तिसऱ्या टप्प्यात ४५ ते ६० वर्षे वयोगटातील नागरिक आणि चौथ्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. मात्र, लसींचा अपुरा पुरवठा आणि नियोजनाचा अभाव यामुळे शहरातील लसीकरणात पहिल्या दिवसापासून अडथळ्यांची शर्यत ठरली आहे.
-----
१) जिल्ह्यातील आतापर्यंतचे लसीकरण
पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी १४३२४० ७९७७१
फ्रंटलाईन वर्कस २०७५०९ ७०८११
१८ ते ४५ वयोगट ४२७३६ ----
४५ ते पुढील वयोगट १६४००५२ ३०३५२५
--------
२) केवळ ११४ केंद्रे सुरू
शहरात १९२ लसीकरण केंद्रे असून, सध्या ११४ सुरू आहेत. त्यापैकी केवळ सहा केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. इतर केंद्रांवर ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी कोव्हीशिल्डचे दोन्ही डोस आणि कोव्हक्सिनचा केवळ दुसरा डोस देण्यात येत आहे. कोविन ॲपवरून नोंदणी करताना नागरिकांना ओटीपी न येणे, अगदी सुरुवातीपासून स्लॉट भरले असल्याचे दाखवणे अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
३) कोणत्या केंद्रावर कोणते लसीकरण
१८ वयापेक्षा जास्त वयाच्या लोकांना कमला नेहरू हॉस्पिटल, राजीव गांधी हॉस्पिटल, अण्णासाहेब मगर हॉस्पिटल, जयाबाई सुतार दवाखाना, मुरलीधर लायगुडे हॉस्पिटल आणि ससून हॉस्पिटल येथे लसीकरण करण्यात येत आहे.
४) लसीकरण दहापासून; रांगा सकाळी सातपासूनच
लसीकरणाची केंद्रे, नियोजन यामध्ये रोजच्या रोज बदल होताना दिसत आहेत. अनेक केंद्रांवर केवळ १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण सुरू असल्याची ज्येष्ठ नागरिकांना कल्पना नसल्यामुळे नागरिक सकाळी ७ वाजल्यापासूनच केंद्रांवर गर्दी करत असल्याचे चित्र आहे.
५) नागरिक वैतागले
कोरोनापासून वाचण्यासाठी लसीकरण सुरू झाले तेव्हापासून आम्ही प्रयत्न करत आहोत. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला. आता दुसऱ्या डोससाठी गेले चार दिवस हेलपाटे मारत आहोत. मात्र, लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. उन्हातान्हात हेलपाटे मारून तब्येत बिघडून वेगळाच त्रास सुरू होईल की काय, अशी भीती वाटते.
- रामनाथ जेधे, ज्येष्ठ नागरिक