पुणे : बँक खात्यात निर्धारित रकमेपेक्षा कमी रक्कम शिल्लक असणे थकीत कर्ज असलेल्या खात्यातून रक्कम न काढता येणे अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांबाबत महिला व बालविकास विभागाने बँकांसाठी नव्याने निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार बँकांनी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातून कोणतीही रक्कम कापू नये, असे स्पष्ट निर्देश विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी सर्व बँकांना दिले आहेत.
‘लाडकी बहीण’ योजनेतंर्गत जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र, ही रक्कम लाभार्थ्यांना खात्यातून न काढता येणे, कर्जाच्या थकीत हप्त्यांमध्ये ही जमा झालेली वळती करून घेणे, असे प्रकार उघड झाले आहेत त्यामुळे महिला लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे चित्र राज्यात अनेक ठिकाणी असल्याने महिलांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका, अशी सूचना महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी सर्व बँकांना केली आहे.
राज्यातील १ कोटी ४० लाख महिलांनी या योजनेत अर्ज भरले आहेत. राज्य सरकारने त्यापैकी १ कोटी पाच लाख लाभार्थ्यांच्या खात्यात दोन हप्ते अर्थात तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केले आहेत. हे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होत आहे.
योजनेंतर्गत जमा झालेली रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित केली जाऊ नये. ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून, ती इतर समायोजनासाठी वापरता येणार नाही. कोणत्याही कर्जाच्या थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देऊ नये. काही लाभार्थ्यांकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले असल्यास बँक खाते तत्काळ सुरू करण्यात यावे, अशा सूचना राज्यस्तरीय बँकर्स समिती, बँक ऑफ महाराष्ट्र, तसेच मुंबई वगळून सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना दिल्या आहेत.