पुणे : एकीकडे काश्मिरमध्ये 70 ते 80 लाख लाेक नजरकैदेत आहेत. हजाराे लाेकांना अटक करण्यात आली आहे. अन दुसरीकडे 370 रद्द केल्याबद्दल टाळ्या वाजवल्या जात आहेत. हे वेदनादायी असल्याची भावना भाजपाच्या मंत्रीमंडळातील माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली.
गांधी स्मारक निधीतर्फे पुण्यातील गांधीभवन येथे त्यांच्या व्याख्यानाचे आयाेजन करण्यात आले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी कुमार सप्तश्री उपस्थित हाेते.
यशवंत सिन्हा म्हणाले, 370 रद्द केल्यानंतर मला देखील काश्मिरमध्ये जाण्यापासून राेखण्यात आले. श्रीनगर एअर पाेर्टवरुन मला पुन्हा दिल्लीला पाठवण्यात आले. त्यानंतर अनेकांनी मला विचारले की तुम्ही याविराेधात सर्वाेच्च न्यायालयात जाणार का ? मी त्यांना नाही सांगितले. न्यायपालिकेच्या कारभारावर मी नाराज आहे. सर्वाेच्च न्यायालय हे काय काश्मिरमध्ये जाण्यासाठी विसा देणारं आहे का ? व्यक्तीगत स्वातंत्र्यासाठी जे सर्वाेच्च न्यायालयात गेले त्यांना न्याय मिळाल नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर मूलभूत हक्कांपासून नागरिकांना वंचित ठेवले जात आहे. सर्वाेच्च न्यायालय सुद्धा सध्या दबावाखाली काम करत आहे.काश्मिरच्या नागरिकांसाठी एक आंदाेलन उभे करण्याची गरज आहे.
राेज संविधान, अर्थव्यवस्था आणि काश्मीरवर सर्जिकल स्ट्राईक केले जात आहेत. शेख अब्दुल्ला यांनी काश्मीरचा विकास केला. परंतु आज ते देखील नजरकैदेत आहेत. काश्मिरी लाेक संपन्न आहेत. परंतु चित्र असे उभे केले जाते की काश्मीरचा विकास झाला नाही. काश्मिरी जनतेची आणि संविधानाची गळचेपी केली जात आहे. सरकारच्या विराेधात भूमिका घेणाऱ्यांना देशद्राेही ठरवले जात आहे. त्यामुळे सरकारच्या विराेधात बाेलायला काेणी तयार नाही. देशात विरोध करण्याची परंपरा संपल्यासारखे वाटत आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
मी ज्या पक्षात हाेताे त्याची वाटचाल याेग्य न वाटल्याने मी बाहेर पडलाे. देशासाठी याेग्य असणाऱ्या गाेष्टी शेवटच्या श्वासापर्यंत मी बाेलत राहणार असेही त्यांनी यावेळी सांगितले.