पुणे: देशात मुलींसाठी पहिला शाळा सुरू झाली ती पुण्यामध्ये. ही शाळा सुरू करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर मात करत महात्मा फुलेंनी 1848 रोजी मुलींसाठी शिक्षणाची कवाडे खुली झाली. आजही अनेक भागातील मुलींना शिक्षणापासून दूर रहावे लागत आहे. मात्र आता महात्मा फुले (mahatma jyotiba phule) यांचं मुळ गाव असणाऱ्या खानवडीत मुलींची मोठी शाळा बांधली जाणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी पुण्यात दिली.
याठिकाणी महात्मा फुलेंचं स्मारकही होईल. तसेच सातारा, खानवडी आणि पुणे अशा तीनही ठिकाणी मुलींच्या शाळा बांधण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहितीही खासदार सुळे यांनी दिली. तसेच राज्यातील ऐतिहासिक ठिकाणांचा विकास आणि डागडुजीवरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
'लखीमपूर प्रकरण सहन केले जाणार नाही'-
लखीमपूर हत्याकांडासारखी प्रकरणे आम्ही कधीच सहन करणार नाही. असा कुठलाही अन्याय कोणत्या महिलेवर आणि शेतकऱ्यांवर होणार असेल तर कोणाचीही सत्ता असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस कधीच सहन करणार नाही. तिथे लोक शांततेच्या मार्गानेच आंदोलन करत होते. त्यांच्यावर झालेला हल्ला उत्तर प्रदेश सरकारनेच केला आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीची भूमिका पवारांनी काल दिल्लीत मांडली असल्याची माहितीही खासदार सुळे यांनी दिली.
प्रियांका गांधीच्या अटकेवर बोलताना सुप्रिया ताई म्हणाल्या, पवार साहेब यावरही बोलले आहेत. हीच पक्षाची भूमिका आहे. आम्ही खंबीरपणे कुठल्याही अन्यायाच्या विरोधात उभे राहणार. प्रियांकाजी, बघेलजी यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहू. प्रियांका गांधी यांच्या अकटेनंतर देशात अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चे काढले होते.
लखीमपुरमध्ये एवढं सगळं होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणावर काहीच न बोलल्याचे आश्चर्य वाटते. ते कधीच अशा प्रकरणांवर बोलत नाहीत. गेल्या महिनाभरात बलात्कार घटना झाल्या तेव्हाही गप्प होते, आताही ते काही बोलले नसल्याचे, खासदार सुळे म्हणाल्या.