काेरेगाव भीमा : विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय काेरेगाव भीमा येथे दाखल झाला आहे. जनसमुदायाच्या मुखात ‘जय भिम’ चा नारा होता. राज्यभरातुन आलेल्या समाजबांधवांनी सोबत मशाली आणल्या होत्या. या पेटत्या मशाली द्वारे विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. मंगळवारपासून अंदाजे 14 ते 15 लाख नागरिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी दाखल झाले आहेत. पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. काेरेगाव भीम येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरासह उत्तर प्रदेश , मध्यप्रदेश , गुजरात , हरियाना , कर्णाटकसह आंध्र प्रदेशातुन मोठ्याप्रमाणावर आंबेडकरी समाज विजयस्तंभाजवळ एकवटला होता. या नागरिकांमध्ये उत्साह भरण्याचे काम जागोजागी शाहिरी जलशाच्या माध्यमातुन केले जात होते. भारत मुक्ती मोर्चा , रिपब्लीकन सेना , आरपीआय , भारतीय बौध्द महासभा यांसह अनेक सामाजीक संघटना पक्षांच्या मंडपांमध्ये शाहिरी जलसे रंगले होते. आंबेडकरी चळवळीची आणि सामाजीक विषमतेवर सडेतोड भाष्य करणारी गीते याठिकाणी गायली जात होती. यासोबतच मराठवाडा , विदर्भातुन आलेले कलाकार रस्त्याच्या कडेला, झाडाखाली सावलीत बसुन प्रभोधनात्मक गाणी सादर करीत होते.
नागरिकांना विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी मुख्य रस्त्यापासून एका रांगेत सोडण्यात येत होते. उन्हाच्या तडाख्यामुळे अनेकांना रांगेतच घेरी आली. यामध्ये लहान मुलांची संख्या अधिक हाेती. दुपारच्या उन्हातही भीमसैनिक आणि नागरिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी रांगेत उभे होते. पोलीसांनी अभिवादन स्थळावर जाण्यासाठी दोन रांगा करुन बाहेर पडण्यासाठी तीन रांगा केल्या होत्या यामुळे चेंगराचेंगरी झाली नाही. विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी गर्दीचा उच्चांककोरेगाव भीमा येथे मंगळवार रात्रीपासुन सुरु असलेला गर्दीचा ओघ बुधवारी पहाटे पासूनच वाढायला सुरुवात झाली होती. कोरेगाव भीमापासून नगर व पुण्याकडे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्याप्रमाणात गर्दी दिसून आली. अंदाजे 14 ते 15 लाख लोक अभिवादनासाठी याठिकाणी आले होते.