कळस : (ता. इंदापूर) येथील बाबीर गडावर देवाच्या यात्रेसाठी आज यात्रेच्या मुख्य दिवशी सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले. यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी यात्रा काळात देवदर्शनासाठी हजेरी लावल्याने परिसर बाबीर देवाच्या नावाने चांगभलं म्हणत अलोट गर्दीने फुलला होता. आमदार दत्तात्रेय भरणे, आमदार यशवंत माने,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, सभापती प्रवीण माने, यांसह अनेकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला.
सोमवारी दिवाळी पाडव्यादिवशी निमोणे ता संगमनेर येथुन परंपरेप्रमाणे पायी चालत आलेली बाबीरभक्त साहेबराव मंडलिक यांची हजारो भक्तांची पायीदिंडी रुई गावात आल्यानंतर देवाच्या पालखीने मंदिराकडे प्रस्थान ठेवले. गुलालाची उधळण, तोफांची सलामी व ढोलाच्या निनादात पालखी मंदिरस्थळी आली. यानंतर देवाचा घट हलविल्यानंतर यात्रेस सुरवात झाली. यावेळी भाविकांनी देवदर्शनासाठी हजेरी लावण्यास सुरवात केली मंगळवार हा यात्रेचा मुख्य दिवस होता. यावेळी देवदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. दिवसभर नवस परतफेडीचा कार्यक्रम झाला.तसेच अमोल भिसे मित्र मंडळाच्या वतीने गजेढोल स्पर्धा घेण्यात आल्या लोप पावत चालली असलेली ही कला या यात्रेत टिकून आहे तसेच घोंगडी बाजारपेठेत सुमारे पाच हजार नगांची विक्री झाली यामध्ये मोठी उलाढाल झाली तसेच घरगुती लाकडी वस्तू व यात्रा बाजारातही मोठी उलाढाल झाली महिलांनी यात्रेमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे दिसत होते यात्रेच्या तिसर्या दिवशी बुधवारी सकाळी नवसाच्या बाळांला पाळण्यात बसवून झुला देवुन नवस फेडण्यात आला तसेच भाकणुक व बगाडाचा कार्यक्रम झाला.
वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेकरुंना वाहतूक कोंडीला सामोरे जाऊ नये यासाठी उत्कृ्ष्ट नियोजन केले होते गावालगतच असलेल्या बाबीर विद्यालयाच्या प्रांगणात पार्किंगची सोय करण्यात आली होती. यामुळे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिरापर्यंत पायी जावे लागत होते. शिवाय रस्त्यालगत एकही वाहन उभे राहू न दिल्याने भाविकांना प्रशस्त रस्ता मिळाला आरोग्य विभागामार्फत येथे बुथ उभारण्यात आले होते. यामध्ये भाविक रुग्णांना चोवीस तास सेवा पुरवण्यात आली. तहसिलदार सोनाली मेटकरी, ग्रामपंचायतींचे सरपंच रुपाली आकाश कांबळे व देवस्थानचे अध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी मुलभुत सुविधा उपलब्ध करून दिल्या यामुळे ग्रामस्थांकडून प्रशासनाच्या नियोजनाचे कौतुक करण्यात आले
धनगर समाजाच्या नेत्यांची पाठ यात्रेसाठी राज्यातील धनगर समाजाचे नेते व दिग्गज मंत्री ,आमदार दरवर्षी उपस्थित राहतात मात्र यात्रेसाठी आवर्जून हजेरी लावणारे मंत्री राम शिंदे ,महादेव जानकर, आमदार रामराव वडकुते, नारायण पाटील , बाळासो मुरकुटे ,उत्तम जानकर, गोपीचंद पडळकर यांनी यावर्षी यात्रेकडे व बाबीर भक्तांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली