भीमाशंकर : सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची विक्रमी गर्दी झाली. भीमाशंकरच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविकांची नोंद झाली. १५ आॅगस्टला सुमारे चार ते पाच लाख भाविक आल्याचा अंदाज नोंदविला जात आहे. पार्किंगसाठी जवळपास ८ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर, २ किलोमीटर दर्शनरांग होती. कळसदर्शनासाठी मोठी गर्दी मंदिराजवळ लोटली झाली होती. यामुळे पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण पडला. मात्र, कोणताही अनुचित प्रकार होऊ न देता दोन दिवसांची यात्रा पोलिसांनी व्यवस्थित पार पाडली. सलग आलेल्या सुट्यांमुळे भाविकांची संख्या वाढणार, याची प्रशासनाला कल्पना होती. गाड्या लावण्यासाठी बनविलेले पाच वाहनतळ पूर्ण भरले होते. त्यानंतर वाहने लावण्यासाठी जागा नसल्यामुळे पालखेवाडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहनतळापासून मंदिरापर्यंत भाविकांना नेण्यासाठी महामंडळाने ठेवलेल्या मिनीबसही कमी पडल्या. भाविकांना या बसला लोंबकळून मंदिरापर्यंत यावे लागले. निगडाळे ते भीमाशंकर हा रस्ता पूर्ण माणसांनी भरला होता. रस्त्याने पायी जागण्यासाठी जागा पुरत नसल्याने अनेक लोक जंगलातील पाय वाटेने जात होते. भीमाशंकर बस स्थानकात मिनीबसमध्ये बसण्यासाठी सुमारे अर्धा किलोमीटर रांग लागली होती. यामध्ये वयोवृद्ध, महिला, लहान मुले यांचे प्रचंड हाल झाले. अनेकांना सुमारे पाच ते सहा किलोमीटर पायपीट करावी लागली. तसेच भीमाशंकरमध्ये अधूनमधून दाट धुके व पावसाच्या सरी पडत असल्यान अनेकांची गैरसोय झाली. या धुक्यात पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्या सापडत नव्हत्या. त्यामुळे अनेक भाविक पोलिसांकडे येऊन तक्रार करीत होते.
भीमाशंकरला दर्शनासाठी लाखो भाविक
By admin | Published: August 17, 2016 1:09 AM