कोरेगाव भीमा: भीमा काठावरील कोरेगाव भीमा नजीक ऐतिहासिक विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी सोमवारी २०६ व्या विजयदिनी विविध पक्ष, संघटना व मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या लाखो अनुयायांनी हजेरी लावली. यावेळी विविध पक्ष , सामाजीक संघटनांच्या वतीने अभिवादन सभांचे आयोजन करण्यात आले होते.
पेरणे फाटा येथे काल मध्यरात्रीपासुनच मोठ्या प्रमाणावर मानवंदनेसाठी गर्दी करण्यात आली होती. दिवसभर विविध पक्ष, संघटनांच्या वतीने येथे रॅली काढीत विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. पेरणेफाटा (ता. हवेली) येथील नियोजित कार्यक्रमास कालपासूनच सुरवात झाली. सकाळी समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली.
मानवंदनेसाठी आलेल्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, क्रीडामंत्री संजय बनसोडे, खासदार अमोल कोल्हे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, चंद्रकांत हंडोरे पिपल्स रिपबलीकन पार्टिचे जोगेंद्र कवाडे, बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष भीमराज आंबेडकर, रिपब्लीकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, भीम आमीर्चे संस्थापक चंद्रशेखर आझाद, आमदार प्रकाश गजभिये, जयदेव गायकवाड, बापू पठारे, जोगेंद्र कावडे, भारतीय दलीत कोर्बाचे भाई विवेक चव्हाण, माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सजेर्राव वाघमारे, भीमा कोरेगाव समन्वय समितीचे राहुल डंबाळे यांसह आदींनी सदर ठिकाणी अभिवादन केले.
यामुळे होते मानवंदनेसाठी गर्दी
कोरेगाव भीमाजवळ भीमानदीकाठी एक जानेवारी १८१८ मध्ये इंग्रज, महार रेजीमेंट व पेशवे यांच्या सैन्यात घनघोर लढाई झाली. यात महार बटालियनच्या ५०० शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या ३० हजार सैनिकांचा पाडाव करुन विजय मिळविला होता. या लढाईत महार रेजीमेंटच्या अनेक शुरविरांना वीरमरन आले. या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी १८२२ मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमानदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. १९२७ सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह विविध राज्यभरातून आंबेडकरी बांधव एक जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागली.
स्तंभावर प्रशासनाचे सुरेख नियोजन
ऐतिहासिक विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने स्तंभस्थळी केलेली अंतर्गत अभिवादन व्यवस्था, तसेच आत व बाहेर जाण्याच्या १३ मार्गिकांच्या व्यवस्थेमुळे नागरिकांची फारशी गैरसोय झाली नाही.