पुणे : गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे गोखलेनगरख पाषाण, रामबाग कॉलनी, धानोरी, चऱ्होली, संतनगर, भवानीपेठ, माळवडी, म्हाळुंगे या परिसरात खंडित झालेला वीजपुरवठा खंडीत झाला. महावितरणचे अभियंता आणि कर्मचारी यांनी पावसात युद्धपातळीवर काम करुन वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अनेक ठिकाणी त्यांना नेमका दोष कोठे आहे, हे सापडत नव्हते. त्यामुळे शहरातील अनेक भाग रात्री उशिरापर्यंत मिठ्ठ काळोख पसरला होता.
पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या काही भागात जोरदार वादळ व मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे व फांद्या वीजयंत्रणेवर कोसळल्या. तसेच काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे आर्द्रता निर्माण होऊन भूमिगत वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. पुणे शहरातील कोथरूडमधील रामबाग कॉलनीमध्ये वीजवाहिनीवर झाड पडल्यामुळे २० वितरण रोहित्रांवरील ४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. वेदविहार परिसरातील चार वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा पावसामुळे वीजवाहिनीत बिघाड झाल्याने बंद पडला. भवानीपेठ येथे उपरी वाहिनीवर झाड पडल्याने चार वितरण रोहित्रांवरील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. झाडे कोसळल्याने गोखलेनगरमधील जनता वसाहत, जनवाडी भागात तसेच पाषाण भागात वीजपुरवठा खंडित झाला. तर सुस रोड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात तातडीने दुरुस्ती कामे करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
नगररोडमधील धानोरी परिसरातील मयूर किलबिल या सोसायटीच्या दोन वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वीजवाहिनीतील बिघाडामुळे बंद पडला होता. २४ तासानंतर गुरुवारी हा वीज पुरवठा सुरु करण्यात यश आले. त्यानंतर पुन्हा पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. तो रात्री उशिरा सुरू झाला.