पुणे : भावाच्या मनगटावर बहिणीने राखी बांधल्यावर भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. परंतु देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे मात्र कोणाशीही रक्ताचे नाते नसले, तरी ते अहोरात्र देशाचे रक्षण करतात. सरहद््दीवरील अशा हजारो सैनिकांना आपला भाऊ मानणाऱ्या पुण्यातील बहिणींनी सव्वा लाखाहून अधिक राख्या सीमेवर पाठविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राखी पौर्णिमेनिमित्त सैनिक मित्र परिवारातर्फे सारसबाग गणपती मंदिरात झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या हस्ते राख्यांचे पूजन करण्यात आले. या वेळी संगीता मावळे, शुभांगी गरूड, रुपाली शास्त्री, राणी गावडे, कल्याणी सराफ, स्वाती ओतारी, प्रीती भडसावळे, अभिनव प्रशालेच्या वंदना आणेकर, आनंद सराफ आदी उपस्थित होते. सैनिकांसाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्र, पत्र व राख्या पाठविण्यात आल्या. ज्योती चांदेकर म्हणाल्या, की देशाच्या सीमेवरील सैनिकांसाठी राखी पाठविण्याचा हा उपक्रम विविध ठिकाणी राबविण्यात यायला हवा. राखी पौर्णिमेसारख्या अशा उपक्रमांमुळे सैनिकांचे मनोधैर्य वाढते. आनंद सराफ यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली.
सैनिकांकरिता सव्वा लाख राख्या
By admin | Published: August 08, 2016 1:41 AM