परिंचे : घरावर किंवा जमिनीवर पतीबरोबर पत्नीचे नाव लावले जात नाही, इतकेच काय तर पती-पत्नीच्या अशा दोघांच्या नावावर जरी घर असले, तरी दारावर पाटी मात्र पतीच्याच नावाची असते अशा बुरसटलेल्या पुरुषी मानसिकतेला फाटा देत पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी घरातील लक्ष्मीला शेतीमध्ये सहहिस्सेदार करत थेट सातबाऱ्यावर त्यांची नावे लाऊन घेतली आहे.
मासूम संस्थेच्या वतीने लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत ‘शेत दोघांचं’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मांढर (ता. पुरंदर) नजीक टोणपेवाडी येथील चौदा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतजमिनीत पत्नीला सहहिस्सेदार म्हणून पत्नीचे नावही सातबारा उताऱ्यावर नोंदविले आहे. या वेळी मासूम संस्थेच्या तालुका सह संयोजिका जयश्री नलगे, मीना शेंडकर, महिलांचा संपत्ती हक्क प्रकल्प अधिकारी साधना महामुनी आदी उपस्थित होते.
समाजामध्ये महिलांना समान हक्क मिळावा म्हणून अनेक कायदे केले जातात. मात्र, घरामध्ये तिला समान दर्जा मिळत नाही. घरामध्ये तिचा लक्ष्मी म्हणून गौरव होत असला, तरी त्या लक्ष्मीच्या नावावर घरातील फुटकी कवडीही केली जात नाही. इतकेच काय ती सरकारी नोकरदार असेल तर कर्ज तिच्या नावे आणि कर्जावर घेतलेल्या मालमत्तेला मात्र नवऱ्याचे नाव अशा घटना समाजात दिसतात. पुरुषांच्या मनातील या पुरुषी मानसिकतेला फाटा देताना पुरुषांच्या मनातील अहंकार नष्ट करून घरातील स्त्रियांना निम्मा हक्क देण्यासाठी लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत ‘शेत दोघांचं’ हा उपक्रम राबविण्यात आला. स्त्रियांना समान हक्क मिळवण्यासाठी गावातील तब्बल चौदा पुरुषांनी थेट ७/१२ उताऱ्यावर सह हिस्सेदार म्हणून बायकोचे नाव लावले.
--
कोट
खेडेगावातील या शेतकऱ्यांचा आदर्श शहरात राहणाऱ्या पुरुषांनी घेणे ही महत्वाचे आहे. केवळ बाहेर स्त्रीवादी गप्पा मारण्यापेक्षा किमान एखादी प्रॉपर्टी घरातील महिलांच्या नावे करावी, किमान घरातील स्त्रियांच्या नावाची पाटी लावावी आणि स्त्रीला सन्मान द्यावा, तिचा आत्मविश्वास वाढवावा.
- हेमंतकुमार माहुरकर
--
फोटो क्रमांक : २६परिंचे महिलेचे नाव
फोटो ओळ- पत्नीला जमिनीत सह हिस्सेदार बनवणाऱ्या चौदा कुटुंबांचा सत्कार करताना हेमंतकुमार माहूरकर, जयश्री नलगे, मीना शेंडकर आदी.