पुणे: ससून रुग्णालयातून राज्याच्या विविध शहरांमध्ये ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्या ललित पाटील सह त्याच्या १४ साथीदारांवर पुणेपोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली. टोळी प्रमुख ललित पाटील, अरविंदकुमार लोहरे, अमित शहा उर्फ अमित मंडल, रौफ शेख, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, गोलू सुलतान अन्सारी, प्रज्ञा कांबळे, जिशान शेख, शिवाजी शिंदे, राहुल पंडित यांच्यासह समाधान कांबळे, इम्रान शेख, हरिश्चंद्र पंत या १४ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
३० सप्टेंबर रोजी ससून रुग्णालयाच्या गेट समोरून तब्बल दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन हे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. हे सर्व रॅकेट ललित पाटील हा रुग्णालयातून चालवत होता. त्याला भूषण पाटील, बलकवडे, लोहरे तसेच अन्य आरोपी मदत करत होते. मात्र, आपण या गुन्ह्यात जेलमध्ये सडले जाऊ, आपल्याला कारागृहाबाहेर आता पडताच येणार नाही या भीतीने ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पळाला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना पुणे पोलिसांनी तब्बल तीन किलो सोनेही जप्त केले होते. सध्या ललित पाटील पुणे पोलिसांच्या कोठडीत असून त्याच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. दरम्यान गुरुवारी एक पथक ललितला घेऊन नाशिक येथील त्याच्या घरी गेले होते, यावेळी ललित पाटील यांच्या घरातून आणखी पाच किलो सोने जप्त करण्यात आले.
अंमली पदार्थ विकून मिळालेल्या पैशातून ललितने हे सोने विकत घेतले होते. त्यातील यापूर्वी तीन किलो सोने जप्त केले असताना, आता आणखी ५ किलो सोने जप्त करण्यात आल्याने, ललित ने अजून किती माया साठवून ठेवली आहे असा सवाल देखील उपस्थित होत आहे.