पुणे : ललित पाटील पकडला गेल्यानंतर आता त्याच्या चौकशीतून अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण ललितने स्वतः आपण ससून रुग्णालयातून पळून गेलो नाही, तर आपल्याला पळवण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यातच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी ललितसह मंत्री दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करून या दोन्ही मंत्र्यांना संशयाच्या भोवऱ्यात ओढले आहे. काँग्रेसचे पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनीही या प्रकरणी एका पत्रकार परिषदेद्वारे ससून ड्रग्ज प्रकरणात राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप केला होता. पण त्यांनी या प्रकरणी कुणाचे नाव घेतले नव्हते.
मोठे नेक्सस बाहेर येणार - देवेंद्र फडणवीस..
दरम्यान, बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पुणे दौऱ्यावर आलेले असताना त्यांना ललित पाटील प्रकरणाविषयी विचारण्यात आले. यावेळी त्यांनी ललित पाटील याच्या अटकेनंतर मोठे नेक्सस नक्कीच बाहेर येणार असल्याचे सुतोवच केले. या प्रकरणातील अनेक गोष्टी बाहेर येणार असून, अनेक बोलणाऱ्यांची तोंडं बंद होणार आहेत. ललित आज काय बोलतोय यापेक्षा जे नेक्सस बाहेर येणार आहे ते महत्त्वाचे असणार आहे, तसेच सर्व दोषींवर कारवाई केली जाईल असेही देवेंद्र फडणीवस म्हणाले.
ललित पाटील प्रकरणाचा घटनाक्रम...
१) ३० सप्टेंबर - ससून रुग्णालयाच्या गेटजवळ २ कोटी १४ लाख ३० हजार रुपये किमतीचे १ किलो ७१ ग्रॅम ५३ मिलीग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन जप्त.२) ३० सप्टेंबर ऑक्टोबर - ललित पाटील याच्याजवळ २ मोबाइल सापडल्याने ससूनच्या प्रशासनावर प्रश्चचिन्ह.३) १ ऑक्टोबर - ललित पाटील ससून मधून पळाला. ससून मध्ये ललितला दिल्या जाणाऱ्या व्हिआयपी ट्रिटमेंटवर प्रश्नचिन्ह.४) २ ऑक्टोबर - ललितला पळवून लावण्यासाठी ससूनमधील विद्युत पुरवठा बंद केल्याची धक्कादायक माहिती समोर. ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह.५) ३ ऑक्टोबर - कैदी वॉर्डातील कॅमेरे भींतीकडे, ससूनच्या अधिष्ठातांची टोलवाटोलवीला सुरूवात.६) ४ ऑक्टोबर - ससून म्हणजे मेडिकल कस्टडी नव्हे मौजमजेचे ठिकाण, ललित रोजचे पैसे देत असल्याचे उघड.७) ५ ऑक्टोबर - ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांचे मौन कायम. ससूनच्या गार्डवर सहायक पोलिस आयुक्त करणार निगराणी - पोलिस आयुक्तांचे आदेश.८) ६ ऑक्टोबर - ललित नेहमी ससूनमधून बाहेर येत जवळच्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट.९) ७ ऑक्टोबर - ससूनमध्ये व्हीआयपी कैद्यांना स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याची माहिती. ललित पाटील पलायन प्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर.१०) ८ ऑक्टोबर - ललित पाटील याचा राजकीय पाठबळ असल्याच्या आरोपांना सुरूवात.११) ९ ऑक्टोबर - पोलिस आयुक्तांनी या घटनेनंतर एका महिला पोलिस उपनिरीक्षकासह ९ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले, ससूनमध्ये मात्र कोणीच दोषी कसे नाही असा सवाल.१२) १० ऑक्टोबर - आमदार रवींद्र धंगेकर यांची ससून रुग्णालयात धडक. ललितच्या बडदास्तीसाठी डीनला शिंदेंच्या मंत्र्याचा फोन - धंगेकरांचा आरोप. अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर मात्र अद्यापही गप्पच.१३) ११ ऑक्टोबर - ललितचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे या दोघांना पुणे पोलिसांनी नेपाळ बॉर्डरजवळून अटक केली.१४) १२ ऑक्टोबर - शहरात ड्रग्जचा सप्लाय कसा होतो, अल्पवयीन मुलांचा ड्रग्जच्या तस्करीसाठी कसा वापर केला जातो याची माहिती. आणि ससूनच्या चौकशीसाठी समितीची स्थापना.१५) १३ ऑक्टोबर - ड्रग्ज प्रकरणात एसआयटी समिती स्थापन करा, सीबीआय चौकशी करा यासह अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी.१६) १४ ऑक्टोबर - ललितने एकूण ७० लाख रुपये वाटल्याची पोलिस दलात चर्चा. ससूनमध्ये कैद्यांच्या उपचारांची कागदपत्रे बदलण्याचा प्रशासनाचा प्रताप, एका महिला डॉक्टरचा बळी देण्याचा प्रयत्न.१७) १५ ऑक्टोबर - ससूनच्या चौकशी समितीने ८० जणांचे जबाब नोंदवले.१८) १६ ऑक्टोबर - पोलिसांच्या तपासात ड्रग्ज रॅकेट प्रकरणात आणखी ७ आरोपी असल्याची न्यायालयाला माहिती.१९) १७ ऑक्टोबर - ससूनमध्ये अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आणि त्यांचा मुलगा डॉ. अमेय ठाकूर यांची ठाकूरगिरी कशापद्धतीने सुरू आहे याचा स्पेशल रिपोर्ट.२०) १८ ऑक्टोबर - ललित पाटील याला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी बंगळुरू येथून केली अटक.