पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी होत नसल्याने, तसेच दोषींवर कडक कारवाई होत नसल्याने पोलिस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे पत्र आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांना पाठवले आहे. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता या ठिय्या आंदोलनाला सुरूवात होणार असल्याची माहिती, धंगेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
ललित पाटील प्रकरणामुळे शहराची सर्वत्र जी चर्चा सुरू आहे, ती अजिबात भूषणावह नाही. अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष केल्यास पुण्याचा होत असलेला उडता पंजाब बघता सुज्ञ पुणेकर आणि लोकप्रतिनिधी म्हणून स्वस्थ बसू देत नसल्याचे देखील पत्रात म्हटले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमदार धंगेकर यांच्याकडून ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टर, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि कारागृह प्रशासन गुंतले असल्याचे सांगितले जात आहे.
शासनाने नेमलेल्या चौकशी समितीने देखील त्यांच्या अहवालातून तेच सांगितले आहे. मात्र, असे असताना देखील ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त करण्यात आले. त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणातील बडे पोलिस अधिकारी, ससून आणि कारागृहातील अधिकारी-कर्मचारी यांना अद्याप हातही लावलेला नाही. त्यामुळे पोलिसांची सुरू असलेली कारवाई वरवरची असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे खरे दोषी समोर येतील, दोषींवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी पोलिस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे आमदार धंगेकर यांनी पत्राद्वारे कळवले आहे.