पुणे : ‘ससून’मधील ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणात मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांना नाशिकहून धमकीचे फोन व पत्र आले. याबाबत अंधारे यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांची भेट घेत त्यांच्याकडे सदर पत्र देत त्वरित तपास करण्याची मागणी केली.
अंधारे यांनी ललित पाटील प्रकरण उघडकीस येताच, यात राज्य सरकारमधील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यावरून बराच गदारोळ झाला. अंधारे यांच्यावर संबंधित मंत्र्याने टीका करत याचे पुरावे सादर करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर धुरळा थोडा खाली बसताच अंधारे यांनी त्यांना धमकीचा फोन व पत्र आले असल्याचे जाहीर केले. या पत्राची प्रत त्यांनी पोलिस आयुक्तांकडे दिली.
शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे तसेच अन्य पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते. ललित पाटील प्रकरणात लक्ष घालू नका, असे पत्रात म्हटले आहे. फोनवरूनही तसेच सांगण्यात आल्याची माहिती अंधारे यांनी पोलिस आयुक्तांना दिली. आयुक्तांनी याचा तपास करण्याचे आश्वासन दिले. अशा प्रकारे पत्र पाठवणे, फोन करणे याचा सरळ अर्थ मी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य होते असाच होतो, असे सांगून या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी नीट चौकशी करून यामध्ये गुंतलेल्या सर्वांना शोधून काढावे, अशी मागणी अंधारे यांनी केली.