पुणे - ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी ससून रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना गुन्हे शाखेने अटक केली. ललितला उपचारासाठी दाखल करण्याची शिफारस केल्याप्रकरणी येरवडा कारागृहातील डॉ. संजय मरसाळे यांना गुन्हे शाखेने सोमवारी अटक करण्यात आली होती. डॉ़ देवकाते याने ससूनमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या ललितला मदत केल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर डॉ. प्रविण दादासाहेब देवकाते (वय ४०) याला रात्री उशिरा अटक करण्यात आली.
चाकण येथे मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी ललित पाटीलला अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहात तो न्यायालयीन कोठडीत होता. आजारी असल्याचा बहाणा करुन ललित ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. ससूनमध्ये उपचार घेत असताना ललित पाटील हा ससून रुग्णालयातून मेफेड्रोनची विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेने २९ सप्टेंबर रोजी ससून परिसरात कारवाई करुन ललितच्या दोन साथीदारांना पकडले होते. त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते़. ललित पाटीलवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसर्या दिवशी तो ससून रुग्णालयातून पळून गेला. त्याला पळून जाण्यासाठी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनीच मदत केल्याचे उघड झाल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली.
त्यातूनच शासनाने चौकशी समिती नेमली होती. समितीच्या शिफारसीनुसार डॉ. प्रविण देवकाते याला निलंबित करण्यात आले तर, ससूनचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच्याकडून कार्यभार काढून घेण्यात आला होता.
ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते, येरवडा कारागृहातील समुपदेशक सुधाकर इंगळे यांना अटक करण्यात आली. तपासात डॉ. मरसाळे यांनी ललितला ससून रुग्णलायात उपचारासाठी दाखल करण्याचे पत्र दिल्याचे निष्पन्न झाले. डॉ. मरसाळे यांनी ललितकडून पैसे घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांना सोमवारी अटक करण्यात आली. त्यानंतर आता डॉ. प्रविण देवकाते याला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.