पुणे : राज्यभर गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटीलचा ताबा अखेर मंगळवारी पुणे पोलिसांना मिळाला. सोमवारी मुंबईतील दादर न्यायालयाने ललितची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर पुणे पोलिसांनी ललितला अटक करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाकडून प्रॉडक्शन वॉरंट मिळवले होते. त्यानुसार मंगळवारी न्यायालयाच्या आदेशानुसार, पुणे पोलिसांनी ललितचा ताबा घेत त्याला अटक केली.
ससून रुग्णालयाच्या गेटवरच दोन कोटींच्या मॅफेड्रॉन या अमली पदार्थांसह ललित पाटीलच्या दोन साथीदारांना गुन्हे शाखेच्या पथकाने ३० सप्टेंबर रोजी अटक केली आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालवत होता. पुणे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर २ ऑक्टोबर रोजी ललित हा ससूनमधून पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. त्याला पळून जाण्यास त्याचा भाऊ भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, त्याची मैत्रीण प्रज्ञा कांबळे, रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहाना, त्याचा चालक दत्तात्रय डोके यांनी मदत केली होती. पुढे या प्रकरणात भूषण पाटील व बलकवडेला नेपाळ बॉर्डरवरून अटक झाली. त्याच वेळी दुसरीकडे ललित मुंबईच्या साकीनाका पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंबई तसेच इतर ठिकाणच्या धागेदोरे धुंडाळले. सोमवारी (३० ऑक्टोबर) रोजी त्याला न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर त्याचा ताबा मिळावा, यासाठी पुणे पोलिसांनी मुंबई येथील न्यायालयात अर्ज केला होता. ललितसोबतच त्याचे साथीदार शिवाजी शिंदे आणि राहुल पंडित या आरोपींचा ताबादेखील मिळाला आहे.
ललितचे अन्य साथीदार आधीपासूनच पुणे पोलिसांच्या ताब्यात असल्याने आणि आता ललितदेखील पुणे पोलिसांच्या अटकेत असल्याने ललितकडून मोठे धागेदोरेदेखील निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
रोज होणार नवे खुलासे...
ललित पाटील याला ज्यावेळी साकीनाका पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी ललितने ‘मी पळालो नाही, मला पळवण्यात आले’ तसेच यात कोण-कोण सहभागी आहेत, त्यांची नावे सांगणार असल्याचे माध्यमांना सांगितले होते. ललितच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर ससून प्रशासन, येरवडा कारागृह प्रशासन आणि पुणे पोलिस यांच्यावर संशयाची सुई वळली होती. मात्र, त्यानंतर या प्रकरणात आतापर्यंत रोज नवे खुलासे समोर आले आहेत. ललित पाटील प्रकरणात त्याला मदत करणाऱ्यांच्या संख्येतही रोज भर पडत आहे. दोनच दिवसांपूर्वी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी ललितचा ससूनमधील मुक्काम कसा वाढवता येईल, यासंबंधीचे पत्र कारागृह प्रशासनाला पाठवल्याचे समोर आले होते. यावरून आता ललित पुणे पोलिसांच्या ताब्यात आल्याने तो किती जणांची नावे घेतो, हे महत्त्वाचे आहे.