पुणे: ड्रग तस्कर ललित पाटील ची प्रेयसी अँड प्रज्ञा कांबळे हिने बेकायदेशीर अमली पदार्थ विक्रीतील पैशाचा विनियोग केला आहे. तसेच तिला गुन्हयातील सर्व गोष्टी माहिती असूनही तिने माहिती लपवली. या गुन्हयात तिचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने तिला अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत (एनडीपीएस) सोमवारी आरोपी करण्यात आले. तिच्यावर आरोपीला पळून जाण्यास मदत करण्यासंबंधीचे कलम लावण्यात आले होते. आता तिच्यावर कटाच्या षडयंत्रात सहभागी होण्याबरोबरच एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ललित पाटीलच्या दोन मैत्रिणी अँड प्रज्ञा कांबळे व अर्चना निकम या दोन मैत्रिणींना नाशिक पोलिसांनी अटक केली. ललित पळून जाण्याच्या आधी अर्चना व प्रज्ञा या दोघी त्याला रुग्णालय परिसरात भेटून आल्या होत्या. अँड प्रज्ञा कांबळे देखील गुन्हयात सहभागी असल्याचा पोलिसांचा संशय होता. रुग्णालयातून पलायन केल्यानंतरही नाशिकला जाऊन त्याने दोघींची भेट घेतली होती. भेटीदरम्यान त्यांनी २५ लाख रुपये हस्तान्तरित केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, अटक केल्यानंतर न्यायालयाने दोघींना सुनावलेल्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपली. गुन्हे शाखेने अँड प्रज्ञा कांबळे हिला एनडीपीएस अंतर्गत आरोपी करण्यासंदर्भात तपास अधिका-यांनी न्यायालयात सांगितले. पोलीस कोठडीचा कालावधी राखीव ठेवत दोघींना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील नीलिमा यादव- इथापे यांनी केली. त्यानुसार त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांची कारागृहात रवानगी
ड्रग तस्कर ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ड्रग्ज प्रकरणात अनेक आरोपिंचा सहभाग निष्पन्न झाला आहे. यात मुख्य आरोपी ललित पाटील सह शिवाजी शिंदे, जिशान इकबाल शेख, राहुल पंडित उर्फ रोहितकुमार चौधरी, इम्रान शेख, हरीश पंत हे पाहिजे आरोपी आहेत. अटक आरोपी व पाहिजे आरोपी यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संगनमताने शिंदे गाव नाशिक याठिकाणी गणेश इंटरप्रायझेस नावाने केमिकल फॅक्टरी मध्ये अमली पदार्थ तयार करणे, त्याची वाहतूक करणे व व्यापार केल्याचे निष्पन्न झाले आहे. पाहिजे आरोपी यांना अटक करून आणि तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करायचे आहे. त्यामुळे दोघांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकिलांनी केली. मात्र न्यायालयीन कोठडी देण्याचा अधिकार प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांना नसल्याने हा गुन्हा एनडीपीएसच्या विशेष न्यायालयात वर्ग करून न्यायालयीन कोठडीची ऑर्डर घेण्यात आली. त्यानंतर दोघांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.