पुणे : ड्रग्जमाफिया ललित पाटीलला ससून रुग्णालयात वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली अनेक महिने बडदास्त ठेवून आश्रय दिल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांची पुण्याच्या गुन्हे शाखेने तीन वेळा चाैकशी केली आहे. चाैकशीदरम्यान ललित पाटीलला जास्त दिवस रुग्णालयात राहण्यास मदत केल्याप्रकरणी त्यांचा सहभागही निष्पन्न झाला आहे. यामध्ये डाॅ. ठाकूर हे सुपर क्लास वन अधिकारी असल्याने यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक व दाेषाराेपपत्र दाखल करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे गुन्हे शाखेने प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव मंजूर हाेताच डाॅ. ठाकूर यांच्यावर कारवाई हाेणार असल्याने डाॅ. ठाकूर यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
ड्रग्जमाफिया ललित पाटील याला ४ जून २०२३ राेजी टीबीच्या शक्यतेने उपचारासाठी ससून रुग्णालयातील श्वसनराेग विभागाच्या अंतर्गत कैद्यांचा वाॅर्ड नंबर १६ मध्ये दाखल करण्यात आले हाेते. टीबी नसल्याने त्याला पाठीच्या दुखण्यासाठी अस्थिराेग विभागात तीन महिने उपचार सुरू हाेते. त्यानंतर डाॅ. ठाकूर यांनी त्यांच्या शल्यचिकित्सा (सर्जरी) युनिटमध्ये हर्नियाच्या उपचारासाठी महिनाभर दाखल केले हाेते.
या दरम्यान अमली पदार्थविराेधी पथकाने ससूनच्या गेटजवळ दाेन काेटी १४ लाख रुपयांचे मेफेड्राॅन हे ड्रग्ज कारवाई करून पकडले. हे ड्रग्ज रॅकेट ससूनमध्ये उपचार घेत असलेला कैदी ललित पाटील चालवत असल्याचे पाेलिसांच्या तपासात आढळले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाटील पळूनही गेला हाेता. त्यावरून पाेलिस प्रशासनाने ललित पाटील याच्या बंदाेबस्तावरील १२ पाेलिसांना निलंबित, तर चाैघांना सेवेतून बडतर्फ केले. दरम्यान, ललित पाटील याच्यावर ड्रग्जप्रकरणी व पळून गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
यानंतर खरे तर पाठीचे दुखणे, हर्निया याच्या उपचारासाठी ललित पाटील चार महिने कसे काय ठेवले गेले, हा प्रश्न उपस्थित झाला. तसेच या मुक्कामासाठी ललित पाटीलने माेठ्या प्रमाणात बंदाेबस्तावरील पाेलिस आणि उपचार करणाऱ्या डाॅक्टरांसाेबत आर्थिक व्यवहार केल्याची चर्चा झाली. या आधी या प्रकरणात ललितला पळून जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील शिपाई महेंद्र शेवते आणि अस्थिराेग विभागाचे सहयाेगी प्राध्यापक डाॅ. प्रवीण देवकाते यांना अटक झाली हाेती.
त्यांच्या व इतर आराेपींच्या चाैकशीतून आणि पाेलिसांच्या तपासातून या प्रकरणाचे धागेदाेरे थेट डाॅ. ठाकूर यांच्यापर्यंत पाेहाेचल्याने गुन्हे शाखेने डाॅ. ठाकूर यांची तीन वेळा चाैकशी केली आणि त्या चाैकशीत त्यांचा ललित पाटील याला अधिक काळ आश्रय दिल्याप्रकरणी सबळ पुरावे आढळून आले. तसा त्यांचा याबाबत जबाबही नाेंदवून घेण्यात आला आहे. मात्र, काेणत्याही क्लास वन अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्या विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी लागते. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव हे सक्षम प्राधिकारी आहेत. त्यांच्याकडे गुन्हे शाखेने डाॅ. ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी व दाेषाराेपपत्र सादर करण्यासाठी फाैजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १९७ नुसार ५ जानेवारीला पाेलिसांनी परवानगी मागितली आहे. ही परवानगी मिळाल्यास डाॅ. ठाकूर यांच्यावर पुढील कारवाई हाेणार असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.
काय आहे कलम १९७
एखादा लाेकसेवक अथवा शासकीय कर्मचारी जर स्वत: गुन्हा करत असेल तर त्या प्रकरणी त्यावर कारवाई करण्यासाठी पाेलिसांना राज्य शासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. याबाबतची तरतूद फाैजदारी प्रक्रिया संहिता-१९७३ (द काेड ऑफ क्रिमिनल प्राेसिजर) च्या कलम १९७ नुसार करण्यात आली आहे.