पुणे : नुकतेच अयोध्येत प्रभू रामाचे प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात आले. यानंतर सर्वसामान्य भक्तांसाठी हे मंदिर खुले करण्यात आले. प्रभू रामाच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांची संख्या वाढत आहे. रेल्वेने विशेषतः स्पेशल आस्था रेल्वे सुरू केली आहे. त्याचं धरतीवर एसटी महामंडळाने पुढाकार घेतला असून, अयोध्येला जाण्यासाठी सरासरी ४५ ते ५५ जणांच्या भाविकांचा ग्रुप असेल तर एक बस सोडण्यात येणार आहे. यामुळे भाविकाना प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घेता येणार आहे. अयोध्येत बांधलेल्या राममंदिराविषयी जगभरातील भाविकांत कुतूहल निर्माण झाली आहे. राम मंदिर दर्शनासाठी अनेक राज्यातून रेल्वे सोडण्यात येत आहे. दर्शनासाठी जाणार्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी राजकीय पक्ष, नेतेही आयोध्या यात्रेचे नियोजन करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून गेल्या महिन्याभरात रोज किमान दहा रेल्वे गाड्या अयोध्या मार्गावर हाऊसफुल्ल धावत आहेत. पाठोपाठ एसटी महामंडळाने अयोध्येला जाण्यासाठी एसटी देण्याची सोय केली आहे. राज्यातून धुळे जिल्ह्यातून पहिली बस दर्शनासाठी सोडण्यात आली होती. त्याच धर्तीवर पुणे जिल्ह्यातून मागणीनुसार बसेस सोडल्या जातील. जर भाविकांचा ५० जणांचा ग्रुप असेल तर त्यांच्या मागणीनुसार आणि सोयीनुसार पाहिजे ती गाडी देण्यात येणार आहे.
५६ रुपये प्रतिकिलोमीटर भाडे...अयोध्यासाठी जाणार्या भाविकांसाठी प्रतिकिलोमीटर ५६ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. त्यासाठी ५० भाविकांनी एकत्र येऊन ग्रूप तयार करावा लागेल. या प्रवासासाठी चांगल्या गाड्या देण्यात येतील. तसेच सोबत दोन चालक असतील. या यात्रेदरम्यान तीन-चार मुक्काम होतील. आरामदायी प्रवासासाठी शिवशाही तर ज्यांना स्वस्तात प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी मागणीप्रमाणे साधी लालपरी बसही देण्यात येईल.
परमिट काढून प्रवास...एसटी महामंडळाचा राज्यात व परराज्याशी प्रवासी वाहतुकीचा करार असलेल्या राज्यात एसटीची प्रवासी वाहतूक करताना परमिट काढण्याची गरज नाही. त्यामुळे अयाध्येला जाताना मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या दोन राज्यांतील वाहतूक परमिट काढावा लागतो. त्यामचे भाड्याच्या स्वरुपात प्रवाशांकडून घेतले जाईल.
पंढरपूर वारी, गणेशोत्सव अशा यात्रा-जत्राच्या काळात भाविकांना करारानुसार बस देण्यात येते. त्याच धर्तीवर एसटी महामंडळने अयोध्येला एकत्रित जाणार्यांसाठी बस सुविधा सुरू केली आहे. त्यासाठी किमान ४५ ते ५५ प्रवासी असावेत. स्थानिक आगारात संपर्क केल्यावर बस उपलब्ध होईल.- प्रमोद नेहुर, पुणे विभाग नियंत्रक