दौंड येथील ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत रामचंद्र उगले यांची गेल्या ५० वर्षांची पत्रकारिता पाहता ते पत्रकारितेबरोबरीनेच समाजाचे दीपस्तंभ होते. गेल्या आठवड्यात त्यांचे ९१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा. उगले यांचा जन्म श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावी सर्वसामान्य कुटुंबात झाला. वि. रा. हे ‘काका’ या टोपणनावाने परिचित होते. गांधीवादी, समाजवादी विचारसरणी असल्याने त्यांचे राहणीमान गांधी टोपी, पायजमा आणि नेहरू शर्ट असे असायचे. हातात कायम पिशवी व पिशवीत सातत्याने कायद्याच्या चाकोरीतील समाजाचे प्रश्न असणारी कागदपत्रे असायची. कुठलीही कायद्याची पदवी घेतली नसली तरी कायद्याचे त्यांना ज्ञान होते. त्यांच्या निवासस्थानापासून जुने गावठाण ३ किलोमीटरच्या अंतरावर आहे. वयाच्या ९१ व्या वर्षीदेखील ते घरापासून गावात पायी चालत येत होते. गेली ५० वर्षे ते पत्रकारितेच्या क्षेत्रात असल्याने कुठलेही मानधन न घेता त्यांनी अखंडपणे पत्रकारिता केली होती. किंबहुना पत्रकारांच्या पाठीवर कर्तृत्वाची थाप पडावी, म्हणून त्यांनी पुण्याच्या केसरी ट्रस्टला ५० हजारांची देणगी दिली होती. कुठल्याही पत्रकारावर वाईट प्रसंग आला तर ते त्याच्या पाठीशी धावून येत. दळणवळणाच्या सोईअभावी त्यांनी तालुक्यात सायकलवर फिरून समाजाचे प्रबोधन केले आहे. ६ महिन्यांपूर्वी त्यांना पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे खासदार शरद पवार यांच्या हस्ते गौरविले होते. पत्रकारितेबरोबरीनेच त्यांनी सामाजिक बांधिलकीतून दौंड ते पुणे रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविले. दौंडच्या रेल्वे स्थानकात उंच पूल गैरसोयीचा असल्याने त्यांनी न्यायालयीन लढा देऊन या पुलावर रेल्वे प्रशासनाला सोईसाठी लिफ्ट बसविण्यास भाग पाडले. गांधीवाद, समाजवाद आणि पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी मोठा जनसंपर्क ठेवल्याने त्यांचा लोकसंग्रह दांडगा असल्याने उगलेकाका हे पत्रकारितेचे दीपस्तंभ होते. (प्रतिनिधी)
समाजाचे दीपस्तंभ ‘काका’
By admin | Published: January 24, 2017 1:28 AM