पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: बुधवारी मध्यरात्री वळती गावच्या काटवनवस्ती येथे नरहरी भोर हे त्यांची पत्नी, आईवडील यांच्यासह घरात झोपले होते. त्यांचे आईवडील बाहेरच्या खोलीत झोपले होते. तर नरहरी व त्यांची पत्नी आतील खोलीमध्ये झोपले होते. पहाटे दीडच्या सुमारास आईवडील झोपलेल्या खोलीतून कपाट उघडल्याचा आवाज आला. आवाजाने पती-पत्नी जागे होऊन त्यांनी आईवडिलांना आवाज दिला. पण प्रत्युत्तर मिळाले नाही. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु, बाहेरील बाजूने कडी लावली होती. त्यामुळे दरवाजा उघडता आला नाही. आईवडिलांना चोरट्यांनी मारहाण केल्याचे त्यांनी खिडकीतून पाहिले. त्याचबरोबर कपाटातील साहित्यही अस्ताव्यस्त पडल्याचे आढळले. हौसाबाई श्रीहरी भोर यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मणिमंगळसूत्र, १५ हजार रुपये किमतीचे कानातले व श्रीहरी बबन भोर यांचा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा ७६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या जबरी चोरीमुळे वळती परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसांपासून खून, चोऱ्या अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने चोरट्यामध्ये पोलिसांची भीती राहिली नसल्यामुळे असे प्रकार मागील दोन महिन्यांत वाढले असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते यांनी घटनास्थळी भेट दिली. नरहरी भोर यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे करत आहेत.
वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून पाऊण लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 4:14 AM