लोणी काळभोर : कार्यालयात जाणाऱ्या महिलेला धक्का मारून तिच्या गळ्यातील जवळपास ६ तोळ्यांचे २ लाख ७० रुपयांचे दागिने चोरट्यांनी हिसकून लंपास केले. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावर मंगळवारी घडली.
याप्रकरणी संध्याराणी सतीश सोनवणे (वय ४५, रा. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे यांच्या सुनेच्या भावाचा विवाह कुंजीरवाडी येथील मंगल कार्यालयात सोमवारी (दि. २२) होता. त्या पती सतीश यांचेसमवेत दुपारी १.३०च्या सुमारास आल्या होत्या.
सायंकाळी ५.३० वाजता विवाह झाल्यानंतर सर्व नातेवाईकांनी जेवण केले. त्यानंतर रात्री ९.३०च्या सुमारास सोनवणे या नणंद कल्पना जगताप व भाची संजीवनी सपकाळ यांच्यासमवेत काही कारणास्तव बाहेर पडल्या. कच्च्या रस्त्याने परत कार्यालयाकडे येत असताना अंदाजे २० ते २५ वर्षांच्या चोरट्याने त्यांना धक्का मारला. सोनवणे स्वत:ला सावरण्याच्या प्रयत्नामध्ये असताना त्याने त्यांंच्या गळ्यातील सोन्याचा राणीहार व मंगळसूत्रामधील पॅन्डल जबरीने हिसकावले. तसेच बाजूच्या शेतात अंधाराचा फायदा घेऊन तो पळून गेला. त्यांनी आरडाओरडा केल्याने तेथे त्यांची नणंद, भाची तसेच इतर नातेवाईक जमा झाले. सर्वांनी त्या इसमाचा आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. त्यानंतर सोनवणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात २ लाख २५ हजार रुपये किमतीचा ५ तोळे वजनाचा राणीहार व ४५ हजार रुपये किमतीचे १ तोळे वजनाचेे मंगळसूत्रामधील पॅन्डल असे एकूण २ लाख ७० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची तक्रार पोलिसांत दिली.