रविकिरण सासवडे - बारामती : देहू ते पंढरपूर पालखीमार्गाचे भूसंपादन निधीअभावी रखडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडतो की काय, अशी शक्यता व्यक्त होत आहे. सुमारे वर्षभरापूर्वी बारामती, इंदापूर तालुक्यांतील बाधित क्षेत्र मोजणीचे काम झाले होते. त्याप्रमाणे शासकीय निर्देशाप्रमाणे बाधित क्षेत्र व शेतकºयांच्या याद्या व रकमेचा अहवालदेखील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला. मात्र भूसंपदनासाठी अद्याप निधी न मिळाल्याने काम रखडले आहे. बारामती उपविभागात या पालखीमार्गाचे दोन टप्पे करण्यात आले आहेत. यामध्ये ३४ गावांचा समावेश आहे. यामध्ये ११२.७९ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून ६ हजार ५३१ बाधित व्यक्तींना ४४३ कोटी, ७३ लाख २८ हजार ९७६ रुपयांची मागणी प्रशासनाने केंद्रसरकारकडे केली आहे. मात्र निधी नसल्याने मोजणी करूनसुद्धा काम रखडले आहे. संत तुकाराममहाराज पालखीमार्गासाठी २०१७ पासून सर्व्हेचे काम सुरू होते. तत्पूर्वी आळंदी ते पंढरपूर हा संत ज्ञानेश्वर पालखीमार्ग तसेच, देहू ते पंढरपूर या संत तुकाराममहाराजांच्या पालखीमार्गाचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आॅगस्ट २०१४ मध्ये केली होती. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच संत तुकाराममहाराज पालखी महामार्गाला एनएचजी ९६५ असा क्रमांक देण्यात आला आहे. संत तुकाराममहाराज पालखीमार्गाचे तीन टप्पे आहेत. या महामार्गाच्या सर्व्हेनंतर बाधित क्षेत्राची मोजणीदेखील युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली. तसेच गावांगावांतील शेतकºयांच्या व बाधित ग्रामस्थांच्या तक्रारींचेदेखील निराकरण करण्यात आले होते. अद्यापदी इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, सणसर व निमगाव केतकी येथील बाधित क्षेत्राचे सर्व्हे व मोजणीचे काम वगळता दौंड तालुक्यातील पाटस, रोटी, वासुंदे, हिंगणीगाडा, खराडेवाडी, तर बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे, जराडवाडी, उंडवडी कडेपठार, कन्हेरी, पिंपळी, काटेवाडी; इंदापूर तालुक्यातील जाचकवस्ती, बेलवाडी, लासुर्णे, जंक्शन, भरणेवाडी, अंथुर्णे, शेळगाव, शिरसटवाडी, हगारेवाडी, गोतोंडी, गोखळी, तरंगवाडी, इंदापूर, वडापुरी, सुरवड, वकीलवस्ती, बावडा, लुमेवाडी, सराटी आदी गावांमधील सर्व्हे व मोजणीचे काम संपूर्णपणे पूर्ण करण्यात आले आहे. २० जानेवारी २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात मंत्रालयस्तरावर झालेल्या बैठकीतदेखील भूमिअधिग्रहणाला गती देण्यासाठी चर्चा करण्यात आली होती. या बैठकीला सर्व विभागांचे अधिकारीदेखील उपस्थित होते. संत तुकाराममहाराज पालखीमार्गात बारामती-इंदापूर, पाटस-वासुंदेफाटा-बारामती, इंदापूर-अकलूज-माळखांबी-बोंडाळे आदी भागाचा समावेश आहे. यानंतरही केंद्राकडून निधी न आल्याने मागील वर्षभरापासून भूसंपादनाचे काम रखडले आहे. ........
बारामती उपविभाग...टप्पा गावे क्षेत्र शेतकरी रक्कमपहिला ९ ६३.११ २,९२७ २१३,१५,४३,३४५दुसरा २५ ४९.६८ ३,५३४ २३०,५७,८५,६३१.......२०१८ मध्ये सर्व्हे व मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. निधी जेव्हा मिळेल त्या वेळी भूसंपादनाचे काम सुरू करण्यात येईल. - दादासाहेब कांबळे, उपविभागीय अधिकारी, बारामती