लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या एमएसआरडीसी रिंगरोड आणि पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया येत्या दिवाळीपूर्वी पूर्ण करणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी येथे व्यक्त केला.
पुणे रिंगरोड आणि पुणे-नाशिक रेल्वे जमीन मोजणी व मूल्यांकन कार्यपद्धती संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख अध्यक्षस्थानी होते. अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, उपवनसंरक्षक राहुल पाटील, उपायुक्त जयंत पिंपळगावकर, उपायुक्त नंदीनी आवडे यावेळी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले की, रिंगरोड तसेच पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या मूल्यांकनासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल. पुणे महानगरासोबतच राज्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. गावस्तरावरील यंत्रणेकडून सातत्याने प्रकल्प कार्याचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गावनिहाय बैठका घेत भूसंपादन प्रक्रियेला गती देत रिंगरोड प्रकल्प पूर्ण गतीने पूर्ण करूया, असे ते म्हणाले.
कोणताही महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया जेवढ्या गतीने पूर्ण होईल, तितक्या गतीने प्रकल्प पूर्ण होतो. समृद्धी महामार्ग हे याचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगून पुणे आणि राज्यासाठीही महत्त्वपूर्ण रिंगरोड प्रकल्प लवकर पूर्ण करू असे डॉ. पुलकुंडवार म्हणाले. भूसंपादन उपजिल्हाधिकारी प्रवीण साळुंके यांनी प्रास्ताविक केले. उपअभियंता संदीप पाटील यांनी आभार मानले.