पुणे : जमिनीच्या दाव्याचा बाजूने निकाल लावून देण्यासाठी वकिलामार्फ त १ कोटी ७० लाख रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणात भूमिअभिलेखचे उपसंचालक बाळासाहेब वानखेड यांचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी फेटाळला.
या प्रकरणात पोलिसांनी एका वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेअटक केली असून, त्या वकिलाने जामीन मिळविला आहे. या प्रकरणात वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर गुुरुवारी सुनावणी झाली. वानखेडेंनी अॅड. शेंडेला सप्टेंबर ते डिसेंबर २०१८ दरम्यान तब्बल ४७७ फोन आणि १२९ मॅसेज केले. तसेच दोघांनी फोनवर ४१ हजार ४४७ सेंकद संभाषण केल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी न्यायालयास दिली. वानखेडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपासासाठी बोलविल्यानंतर त्याने आपला अॅड. शेंडेशी काहीही संबंध नसल्याचे लिहून दिले आहे. त्यात त्याने इतर वकीलांसारखाच तो कार्यालयात येत असल्याचे म्हटले आहे. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेत न्यायालयाने शुक्रवारी वानखेडे यांचा जामीन फेटाळला. त्यामुळे वानखेडे यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.