भिगवण : वडिलांच्या नावाने असलेली जमीन का पेरली, म्हणून सख्ख्या भावांत झालेल्या भांडणात एका भावाला जबर मारहाण करण्यात आली. ही घटना भिगवणशेजारी असणाऱ्या मदनवाडी गावच्या सकुंडेवस्तीवर घडली.याबाबत भिगवण पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार : मदनवाडी येथील दत्तात्रय नानासोा सकुंडे यांनी आपल्या वडिलांच्या नावावर असणाऱ्या शेतात बाजरी पेरण्यास सुरुवात केली होती. याची माहिती त्याचे भाऊ झुंबर नानासोा सकुंडे, भाऊसोा नानासोा सकुंडे आणि नारायण नानासोा सकुंडे यांना मिळाल्याने त्यांनी चिडून जाऊन वाटप न झालेल्या वडिलांच्या नावावर असणाऱ्या जमिनीवर पेरणी का केली, अशी विचारणा करीत शिवीगाळ करीत भांडणाला सुरुवात केली. या वेळी दत्तात्रय यांना लाकडी दांडके आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यात दत्तात्रय यांच्या डाव्या पायाचे नडगीचे हाड मोडले असून मोठी दुखापत झाली. याविषयी गणेश पांडुरंग सकुंडे यांनी फिर्याद दिली आहे. भिगवण पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास बारामती उपविभागीय अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी चंद्रशेखर यादव करीत आहेत. (वार्ताहर)
जमीन पेरली, म्हणून सख्ख्या भावाला जबर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2016 3:47 AM