नातेवाइकच करतात स्वच्छता : विद्युत-गॅस दाहिनीत जमा होत नाही राख
पुणे : कोरोनामुळे गेल्या सव्वा वर्षात मृतांची संख्या वाढली आहे. या मृतदेहांवर पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करण्यास अलीकडच्या महिन्यात परवानगी देण्यात आली. परंतु, जमा होणाऱ्या राखेची तत्काळ विल्हेवाट लावली जाते. ही राख नातेवाईकच स्वच्छ करून जमा करून ठेवतात. त्यानंतर ही राख घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उचलून नेली जाते. या राखेचा वापर करून लँड फिलिंग केले जाते.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर पारंपरिक पद्धतीने लाकडावर किंवा विद्युत अथवा गॅसदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. लाकडावर होणाऱ्या अंत्यविधीमधून राख तयार होते. मात्र, विद्युत-गॅस दाहिनीमधून राख तयार होत नाही. नातेवाईक अंत्यविधीनंतर दोन दिवसांनी सावडण्याचा विधी करतात. या विधीमध्ये अस्थी शोधून झाल्यानंतर उर्वरित राख गोळा केली जाते. ही राख गाड्यांमध्ये भरून स्मशानभूमीत ठरवून दिलेल्या जागेवर नेऊन ओतली जाते.
अंत्यविधी झालेल्या ठिकाणी नातेवाईक शेणाने जमीन सारवून घेतात. ही जागा झाडून, पाणी मारून स्वच्छ करतात. ही राख घनकचरा विभागाकडून उचलून नेली जाते. ही राख जमिनीमध्ये खड्डे करून टाकली जाते. किंवा कचरा रिजेक्ट म्हणून त्याद्वारे लँड फिलिंगचे काम केले जाते. त्यामुळे स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय? असा प्रश्न तूर्तास तरी पालिकेसमोर निर्माण झालेला नाही.
-----
वैकुंठ स्मशानभूमीसह शहरातील सर्वच स्मशानभूमींमध्ये अंत्यविधी झाल्यानंतर उरलेली राख एका ठिकाणी जमा केली जाते. ही राख घनकचरा विभागाकडून उचलून नेली जाते. त्याद्वारे लँड फिलिंग केले जाते. तसेच जमिनीत खड्डे करून त्यामध्ये ही राख टाकली जाते. स्मशानभूमीत राख शिल्लक राहत नाही.
- श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग
-----
विद्युत किंवा गॅस दाहिनीमध्ये मृतदेहांवर अंत्यविधी झाल्यावर राख निर्माण होत नाही. अस्थींचा काही भाग शिल्लक राहतो. त्या अस्थी नातेवाईक घेऊन जातात. पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या अंत्यविधीनंतर नातेवाईक राख उचलून ती जागा स्वच्छ करतात.
- किशोर क्षीरसागर, कैलास स्मशानभूमी
----
अंत्यविधी झाल्यानंतर राहिलेली राख उचलून नेण्यासाठी पालिकेमार्फत व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक शेडजवळ गाडा उभा केलेला असतो. या गाड्यामध्ये राख भरून नेमून दिलेल्या ठिकाणावर ही राख टाकली जाते. तेथून ती घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उचलून नेली जाते.
-----
शहरात संचारबंदी असली आणि बाहेर फिरण्यावर निर्बंध असले तरी नातेवाईक अस्थी घेऊन जातात. पोलीस आणि पालिकेची यंत्रणा अशा नातेवाईकांना सूट देते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अगदी सुरुवातीच्या काळात अस्थी घेऊन जाण्यास नातेवाईक घाबरत होते. परंतु, पालिकेने प्रबोधन केल्यानंतर नातेवाईक या अस्थी घेऊन जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अस्थी विसर्जनास अडचणी येत नाहीत.