भूगाव : ज्यांच्या विचारांनीदेखील एक नवचैतन्य प्राप्त होते, असे तमाम मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजीमहाराजांची जयंती भूगावमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत भूगाव, सह्याद्री प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ मंडळ भूगाव यांच्या वतीने गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावातील शिवरायांच्या स्मारकाभोवती मंडप घालून फुलांची आरास करण्यात आली होती. सकाळी लवकर स्मारकास अभिषेक करून पूजन करण्यात आले. गावातील अनेक तरुण मुले एकत्र येऊन शिववंदना म्हणण्याचा उपक्रम गेली अनेक वर्षे अखंड चालूच आहे. तरुणांनी तालुक्यातील अपरिचित असे पाच किल्ल्यांची माहिती, फोटो, जाण्याचा मार्ग असे भिंतीवरील फ्लेक्स करून स्मारकाजवळ लावल्याने अनेकांना किल्ल्यांची माहिती होत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अनेक विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा करून आले होते. विद्यार्थ्यांनी शिवाजीमहाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे देऊन, गाणी, पोवाडे सादर करून उपस्थितांचीमने जिंकली. या वेळी विद्यार्थ्यांना बक्षिसांचेही वाटप करण्यात आले. रात्री समस्त ग्रामस्थ भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रमही आयोजिण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या भाषणांनी भारावले ग्रामस्थ
By admin | Published: February 21, 2017 2:04 AM