पुणे : नुकतंच जन्मलेलं बाळ सुदृढ नसेल तर त्याला इनक्युबेटरमध्ये ठेवले जाते. पण लांडोरची अंडी इनक्युबेटरमध्ये ठेवून त्यातून गुटगुटीत पिल्लं बाहेर येण्याची घटना दुर्मीळच. देशात पहिल्यांदाच अशी घटना घडली असून, लांडोरची अंडी सोळा दिवस इनक्युबेटरमध्ये ठेवून त्यातून पिल्लं बाहेर आली आहेत. इला फाउंडेशनने या पिल्लांची काळजी घेतली असून, तिथेच ती वाढत आहेत. माणसांच्या हाती एकदा अंडी लागली तर लांडोर देखील त्यांना सांभाळत नाही आणि ती अंडी नष्ट करते. त्यामुळे या पिल्लांना जीवदान मिळाले आहे.
ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ आणि इला फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश पांडे यांनी हा उपक्रम राबविला असून, त्यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘पिंगोरी परिसरातील एका बांधावर सुरेश शिंदे या शेतकऱ्याला लांडोरची अंडी सापडली होती. गवतातील ही अंडी त्यांनी लगेच पिंगोरीतील इला फाउंडेशनला आणून दिली.’’
‘‘लांडोरच्या अंडीला योग्य तापमान लागतं, अन्यथा ती मरून जातात आणि ही अंडी जर माणसांनी पाहिली तर नंतर लांडोर त्या अंड्यांना उबवत नाही. ती अंडी नष्ट करतात. म्हणून ही अंडी जगविण्यासाठी इला फाउंडेशनने एका तासात इनक्युबेटर तयार केले. त्यामध्ये अंडी ठेवली. या अंड्यांना सतत तीन-चार तासांनी हलवावे लागते. लांडोर चोचीने हे काम करत असते. सुमारे १६ दिवस इनक्युबेटरमध्ये ठेवल्यावर त्यातून पिल्लं बाहेर आली. ही पिल्लं अतिशय निरोगी आणि सुदृढ होती. लगेच त्यांनी खायला सुरुवात केली. ही पिल्लं अंडीमधून बाहेर आली की लगेच खायला सुरुवात करतात, त्यांना शिकवावे लागत नाही.’’
अंड्यांना ३० ते ३५ दिवस उबवावे लागते...
या पिल्लांना गहू, बाजरी, तांदळाची भरड देण्यात येत आहे. तसेच यांना स्पेशल फूड लागते, ते बेल्जियममधून आणावे लागते. ज्याने ती अतिशय हेल्दी राहतात. आमच्याकडे अंडी आली, त्यापूर्वी किमान १५ दिवस लांडोरने ती उबवली होती. त्यानंतर १६ दिवस इनक्युबेटरमध्ये राहिली. या अंड्यांमधून ३०-३५ दिवसांत पिल्लं बाहेर येतात.
जगात अशाप्रकारे अंडी उबवल्याची नोंद कुठेही नाही
''एकदा अंडी उघडी पडली किंवा माणसांनी पाहिली की, मग लांडोर त्यांना जिवंत ठेवत नाही. नष्ट करून टाकते. त्यामुळे ही अंडी दिसली की, ते तसेच सोडून देणं योग्य नाही. कारण त्यात जीव असतो. मग काही लोकं कोंबड्यांच्या खाली ही अंडी ठेवतात, पण कोंबड्यांची अंडी आणि लांडोरची अंडी यात फरक असतो. लांडोरची अंडी मोठी असतात, पण आता लांडोरची अंडी इला फाउंडेशनमध्ये उबवू शकतात, हा प्रयोग पहिल्यांदाच झाला आहे. जगात अशाप्रकारे अंडी उबवल्याची नोंद कुठेही नाही. ही पहिली घटना ठरली आहे असे पिंगोरी येथील इला फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश पांडे यांनी सांगितले आहे.''