रांजणगाव सांडस : रांजणगाव सांडस (ता. शिरुर) येथील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतजमिनीलगतचे ओढे बुजवून त्यावरही शेती करण्याचा सपाटा लावला, त्यामुळे ओढ्यांचा श्वास कोंडला पावसाळ्यात पाणी मुरुन त्या ओढ्यांवरील जमिनीसह अवघ्या एकरच्या एकर शेतजमिनी क्षारपड होत आहेत, त्यावर काटेरी झुडूप सुध्दा उगवत नसल्याने या जमिनी शेतकऱ्यांना असूनही नसल्याचीच अवस्था झाली आहे.
शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील व भीमा नदीच्या काठावरील मांडवगण फराटा, रांजणगाव सांडस, नागरगाव वडगाव रासाई सादलगाव, तांदळी, आलेगाव पागा या नदी काठच्या गावांना भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधल्यामुळे शिरूर दौंड तालुक्याच्या गावांना शेतीसाठी वर्षभर पाणीपुरवठा हा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असतो. जमिनी बागायती झाल्यामुळे या भागात साखर कारखानदारी वाढली त्यामुळे ऊस उत्पादनाचे प्रमाणही वाढले. मात्र अलीकडच्या काळात कुटुंबे जशी विभक्त व्हायला लागली तशाच शेत जमिनीचे विभाजन मोठ्या प्रमाणात सुरु झाले. जमिनीचे लहान लहान तुकडे होण्यास सुरवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना जमिनी परत नसल्याने त्यांनी आसपासचे ओढे बुजवून त्यावर शेती करण्यास सुरवात केली. अनेकांनी तर ओढ्या जवळील सर्वे नंबरचा रस्ताही बंद केल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला जाण्यासाठी रस्ते शिल्लक राहिली नाहीत.
ओढ्याची रुंदी कमी झाल्यामुळे किंवा ओढेच पूर्ण बुजल्यामुळे यंदा झालेल्या पावसाळ्यातील पाणीही या ओढ्यातून वाहू शकले नाही, त्यामुळे पाणी साचून तिथेच मुरले व बाष्पीभवन झाले त्यानंतर मात्र या जमिनीवर प्रचंड क्षार आले. त्यामुळे एकरच्या एकर जमिनी जमिनी क्षारपड चोपण झाल्या आहेत. या चोपण भागात काटेरी झुडपे ही उगवत नाहीत. त्यामुळे ओढ्याकडील जमिनी या पूर्णत: नापीक झाल्या आहेत.
--
चौकट १
श्वास कोंडलेले ओढे
रांजणगाव सांडस व पंचक्रोशीतील मनोरम बाबा ओढा, अडीच नंबर परिसरातील ओढा, बानुबाईचा मळ्यातील दर्याच्या मळ्यातील ओडा, मोरमळा, राक्षेवाडी परिसरातील शिंदे वस्ती परिसरातील ओढा रणपिसे वस्ती परिसरातील ओडा शितोळे वस्ती परिसरातील ओढा यांचा श्वास कोंडला असल्याने ते मरणासन्न अवस्थेत आहेत. ओढ्यातून पाणी बाहेर नदी कडे जाण्यासाठी कोणता मार्गच शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे या जमिनी दलदलयुक्त पान कांजळ, काटेरी झाडे यांनी पूर्णपणे वेढलेले असल्यामुळे या जमीन पूर्णपणे नापीक झालेले आहेत. तसेच पठारावरील भागात शेतकरीवर्गाने शेती करण्यास सुरुवात केल्यामुळे या शेतातील पाण्याचा निचरा ही हा सखल भागाकडे होत असल्यामुळे व ओढ्यातील पाणी जाण्यासाठीमार्ग नसल्यामुळे हे पाणी इतरत्र शेतात पसरले जात आहे.
---
चौकट २
ओढ्यातील गाळ काढल्यास पुन्हा बागायत क्षेत्र वाढेल
ओढ्यातील गाळ काढल्यास या भागातील अल्प भूधारक शेतकरी वर्ग यांची जमीन बागायती होऊ शकतात. शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या काठावरील हजारो एकर चोपण झालेले क्षेत्रही बागायती होऊ शकते. घोड उजवा कालवा लाभक्षेत्र अंतर्गत ओढ्यातील गाळ काढणे, काटेरी झुडपे काढणे, पक्के पूल बांधने यासाठी रांजणगाव सांडस, इनामगाव वडगाव रसाई, मांडवगण फराटा, नागरगाव, राक्षेवाडी, आलेगाव पागा या भागातील चाऱ्यांचे मापदंड केलेले असून शासन दरबारी ते पाठवलेले आहे. मंजुरी मिळताच कामकाज हे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता,यांच्या मार्गर्शनाखाली सुरू होणार आहे.
--
कोट १
ओढ्यातील गाळ काढणे ,काटेरी झुडपे काढणे, पक्के पुल बांधणे ही कामे झाल्यास पानंद रस्ते मोकळे होऊन शेतकऱ्यांच्या सर्वे नंबर रस्ता नुसार शेतकऱ्यांना शेत माल बाहेर काढता येईल त्यासाठी प्रस्ताव तयार केला असून मंजूरी मिळताच काम सुरु होईल.
पाटील, उपअभियंता
--३१ रांजणगाव सांडस ओढ्यावर क्षारयुक्त जमिनी
फोटो ओळी : ओढ्यावर अतिक्रमण करून शेती केल्याने पावसाळ्यात पाणी साठलेल्या जमिनींची अवस्था अशी क्षारयुक्त झाली आहे.