पुणे : मराठी भाषेमध्ये दर्जेदार लिहिती-वाचती पिढी निर्माण व्हावी यासाठी भाषा संस्थेच्या वतीने यंदाच्या वर्षीपासून पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा आॅलम्पियाड ही परीक्षा घेण्यात येणार आहे. जाणता वाचक, जिज्ञासू अभ्यासक आणि कसदार लेखक घडविण्याच्या दृष्टीने भाषा संस्थेतर्फे २०१५ साली शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा आॅलम्पियाड ही अभिनव स्पर्धा घेण्यास सुरूवात झाली. तीन वर्षांमध्ये चौथी आणि सातवीसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेला महाराष्ट्रातील इंग्रजी-मराठी माध्यमांच्या शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या वर्षी सातारा, सांगली, पुणे आणि मुंबईमधून जवळपास १९०० विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. या परीक्षेची उपयुक्तता, लोकप्रियता तसेच पालक व शिक्षकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा पाचवी व सहावीसाठी या परीक्षांची आखणी करण्यात आली असल्याची माहिती भाषा संस्थेच्या अध्यक्षा स्वाती राजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.राजे म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या मनात भाषेच्या गोडीचे बीज रूजावे यासाठी रंजक परीक्षेची बांधणी करण्यात येत असून, ज्ञान, आकलन उपयोजन व कौशल्य या चार घटकांचा विचार त्यात करण्यात आला आहे. परीक्षेचे साचेबद्ध स्वरूप न ठेवता शब्दांशी खेळत भाषेचे सहज सुंदर रूप विद्यार्थ्यांच्या समोर यावे अशा अनेक कृती त्यामध्ये समाविष्ट केल्या आहेत. मुलाच्ंया भाषिक बुद्धिमतेच्या विकासाच्या अनुषंगाने या परीक्षेत भाषिक आकलनाबरोबरच विश्लेषण, अभिव्यक्ती, विचारातील सुसंगती आणि नवनिर्मिती, क्षमता अशा अनेक घटकांचा अंतर्भाव केला जात आहे. भाषेच्या जतनासाठीची मुलभूत पातळीवरची दीर्घकालीन योजना म्हणून रंजक व अभ्यासपूर्ण परीक्षेकडे पाहिले जावे. या परीक्षेचा प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख २५ जुलै आहे. परीक्षेस बसू इच्छिणाऱ्यांनी भाषा फाऊंडेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यंदा पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा आॅलम्पियाड होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 6:45 PM
यंदाच्या वर्षीपासून पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा आॅलम्पियाड ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
ठळक मुद्देयंदाच्या वर्षी सातारा, सांगली, पुणे आणि मुंबईमधून जवळपास १९०० विद्यार्थीपरीक्षेचा प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख २५ जुलै