नम्रता फडणीस
भाषेची पानगळ सुरू झाली आहे, अशी ओरड नेहमीच केली जाते. मात्र प्रादेशिक मराठी भाषेचे संवर्धन करून ती बहरत ठेवण्यासाठी लेखिका आणि बालसाहित्याच्या अभ्यासक स्वाती राजे यांनी भाषा फौंडेशनची स्थापना केली. गेल्या दहा वर्षात भाषा जतनाच्या क्षेत्रात विपुल काम करून फौंडेशनने मानदंड प्रस्थापित केला. नुकतीच राज्य भाषा सल्लागार समितीच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली. आज (21 फेब्रुवारी) साज-या होणा-या जागतिक मातृभाषा दिनानिमित्त स्वाती राजे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद.
* जागतिक मातृभाषा दिन साजरा करण्यामागची पार्श्वभूमी काय?- व्हँंक्वोर मधल्या एका बांग्लादेशी माणसाने कोफी अन्नान यांना एक पत्र लिहिले होते की भाषेच्या जतनासाठी काही करता येईल का? हा विषय संयुक्त राष्ट्रसंघाने उचलून धरला आणि 2000 पासून 21 फेब्रुवारी हा भाषा दिन म्हणून साजरा होऊ लागला. 21 फेब्रुवारीच का ?तर बांग्लादेश मध्ये 21 फेब्रुवारी 1952 साली ढाक्यामध्ये भाषिक विषयावरून हिंसाचार झाला होता. याकरिता त्या बांगलादेशी माणसाने हा दिवस सुचविला. त्यानंतर शांतता, सौहार्द आणि बहुभाषिकत्व यासाठी जगभरात हा दिवस साजरा होऊ लागला. 2008 मध्ये जागतिक भाषा वर्ष म्हणून साजरे झाले आणि आता 2019 हे वर्ष स्वदेशी भाषांचे आहे जे त्याचेच एक विस्तारीकरण आहे. * प्रादेशिक मराठी भाषा संवर्धनाचे काम सुरू करण्यापूर्वी भाषेची काय स्थिती होती?-1990 च्या काळापर्यंत ज्येष्ठ लेखकांची पिढी ही कार्यरत होती. त्यांचा लिहिता हात हा थकत चालला होता. त्यांची जागा नवी पिढी घेऊ शकली नाही. त्याला कारण अनेक होती. टिव्ही घराघरात पोहोचत होते. दृकश्राव्य माध्यमाची लोकांना ओळख होत होती. हळूहळू जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले होते. मनोरंजनाची माध्यम उपलब्ध होऊ लागली होती. त्यामुळे अक्षरांची लया जायला लागली वाचकांची अभिरूची ही विसविशीत होत होती. अशा परिस्थितीत वाचक आणि लेखकामधील नाळ तुटत चालली होती. बालसाहित्याची संशोधक, अभ्यासिका म्हणून देशविदेशी फिरले तेव्हा मुले वाचत नाहीत हे जाणवले.
* गेल्या दहा वर्षांपासून भाषा जतनासाठी काम करीत आहात, त्याची प्रेरणा कशी मिळाली?- 2004 साली दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये गेले होते. त्यावेळी नेल्सन मंडेला यांचे साक्षरता अभियान सुरू होते. आंतरराष्ट्रीय कमिटी नऊ राज्य भाषेसंदर्भात ईर्षेने काम करण्यास उत्सुक होत्या. आमच्या 22 राज्यभाषांबददल कुणी काय करतय का? असा अनौपचारिक प्रश्न विचारला. तेव्हा या 22 भाषा जिवंत आहेत का? असा प्रश्न मला विचारण्यात आला. तेव्हा दहा वर्षाच्या मुलाला मातृभाषा, संस्कृत, हिंदी, पणन भाषा आणि इंग्रजी भाषांची तोंडओळख होते. आम्ही संस्कृती आणि वैविध्यतेच्या तिठ्यावर होतो त्यामुळे आल्या त्या भाषा स्वीकारत गेलो.प्रवासवापसीदरम्यान संस्कृतीमधून मिळालेला हा लाभ आपण जागतिकीकरणामुळे हरवतोय का? असा प्रश्न पडला. देशविदेशात फिरल्यानंतर लोकपरंपरेतून मिळालेले हे ज्ञान विस्मृत्तीत जाईल. यासाठी त्याचे जतन व्हायला हवे असे वाटले.
* भाषा फौंडेशन स्थापनेमागील दृष्टीकोन काय होता?- एखाद्या भाषेचे अस्तित्व 25 वर्षांनी टिकेल असे वाटायचे असेल तर मग 25 वर्षे आधी त्याची बीज रूजवली गेली पाहिजेत. मुलांच्या मनात भाषेची गोडी निर्माण व्हायला हवी, या जाणीवेतून प्रादेशिक भाषांच्या जतन-संवर्धनाचे उददिष्ट हाती घेऊन भाषा फौंडेशनची 2008 मध्ये सुरूवात केली.
* फौंंडेशनची मूहुर्तमेढ रोवताना कोणत्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करण्यात आला ? दहा वर्षात कोणकोणते उपक्रम राबविले?- स्थानिक ते वैश्विक अशा दृष्टीकोनातून भाषेचा विचार करून उपक्रमांची बांधणी करण्यात आली. त्यानुसार वाचनाचा प्रसार करण्यासाठी साप्ताहिक वाचन आणि संवाद केंद्र, दवाखान्यात बुक ट्रॉली, शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमता वाढविण्यासाठी ‘यक्षप्रश्न’ ही राज्यस्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा, मराठी भाषा ऑलिंपियाड तसेच मुलांसाठी विविध प्रादेशिक चित्रपटांचा ’चित्रांगण’ महोत्सव, कथायात्रा हा राष्ट्रीय स्तरावरचा कथामहोत्सव, मुलांसाठी दर्जेदार साहित्यनिर्मिती आणि साहित्यावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदा आणि राष्ट्रीय चर्चासत्र असे वैशिष्टपूर्ण उपक्रम आम्ही राबवित आहोत. ‘संशोधन’ हा या उपक्रमांचा गाभा आहे. त्यातून भाषा जतनाच्या प्रारूप आणि व्यवस्था निर्माण करीत आहोत.
* भाषेचे संवर्धन होण्यासाठी अजून कोणते प्रयत्न होणे अपेक्षित आहे असे वाटते?- भाषांचे डॉक्यूमेंटेशन झाले आहे.त्यातून एक मुलभूत ढॉंचा तयार झाला आहे. आता सर्वांनी रस्त्यावर उतरून एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. नागरिकांनी भाषा जतनाकडे डोळसपणे पाहायला हवे. कुणीतरी काहीतरी करेल पण आपण काहीतरी करणार आहोत की नाही? औद्योगिक कंपन्यांमध्ये सीएसआर उपक्रमांतर्गत भाषा जतनासाठी आर्थिक पाठबळ मिळण्याची गरज आहे.