हडपसर : येथील एका रिक्षाचालकाला रिक्षामध्ये सापडलेला लॅपटॅाप प्रवाशाला परत दिल्याबद्दल पोलिसांतर्फे रिक्षाचालकाचा सत्कार करण्यात आला.
नगरसेविका जीलेहुमा शरीफ यांचा लॅपटॅाप शत्रुघ्न गोपीचंद ओव्हाळ यांच्या रिक्षामध्ये विसरला होता. रिक्षाचालकाने आरपीआयचे हडपसर विधानसभेचे अध्यक्ष संतोष खरात यांच्याशी संपर्क केला. त्यांनी हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते व सहपोलीस फौजदार जे. आर. चिखले यांच्याकडे लॅपटॅाप दिला असता, चिखले त्यांनी याबाबत तपास केला. त्या वेळी लॅपटॉपच्या मूळ मालकाचा शोध घेण्यात आला.
नगरसेविका शरीफ यांचा लॅपटॅाप असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांचा मुलगा शहाबाज खान यांच्याकडे तो स्वाधीन करण्यात आला. रिक्षाचालकाचा हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, फौजदार चिखले व संतोष खरात, राम भंडारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)
सोनसाखळीचे चोरीचे प्रकार वाढत असताना रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. तसेच पोलिसांनीही याची दखल घेऊन सत्कार केल्याने रिक्षाचालकाचे अभिनंदन करण्यात आले.